पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देत अन्य ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department-IMD) व्यक्त केला आहे. (Weather Alert )
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील विदर्भातील नागपूर, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळसह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार, नाशिक मध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे.
एप्रिलमधील उष्णतेच्या तीव्र लाटेनंतर आता मे महिन्यात तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे. मे महिन्यात उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी राहील, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. तसेच मान्सूनच्या उत्तरार्धात एल निनोची स्थिती मध्यम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Weather Forecast)
"वायव्य आणि पूर्व भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात तापमान सामान्य ते सामान्यपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा आहे." असे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, पूर्व-मध्य, पूर्व, ईशान्य आणि द्वीपकल्पीय भारताच्या काही भागांमध्ये मे महिन्यात कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची अपेक्षा आहे. वायव्य आणि पश्चिम-मध्य भारतात तापमान सामान्य ते सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. मे महिन्यात बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि छत्तीसगडचा उत्तर भाग, मध्य प्रदेशचा पूर्व भाग, तेलंगणा आणि गुजरातच्या किनारी काही भागांमध्ये उष्णतेची लाट तीव्र असेल.
हेही वाचा