मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेला जमीन दाखवणार्यांना मुंबई महापालिका निवडणुकीत अस्मान दाखवून देऊ, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांना मंगळवारी प्रतिआव्हान दिले.
शहा यांनी आपल्या मुंबई दौर्यात शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. धोका देणार्या शिवसेनेला जमीन दाखविण्याची, धडा शिकविण्याची भाषा शहा यांनी भाजप पदाधिकार्यांशी बोलताना केली होती. अमित शहा यांच्या एक दिवसाच्या मुंबई दौर्यानंतर मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी आपल्या 'मातोश्री' निवासस्थानी शिवसेना नेत्यांची बैठक घेतली. अरविंद सावंत, भास्कर जाधव आदी नेते या बैठकीस उपस्थित होते. शिवसेनेला जमीन दाखवणार्यांना मुंबई महापालिका निवडणुकीत अस्मान दाखवून देऊ, असे प्रतिउत्तर ठाकरे यांनी शहा यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत दिले. दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असे सांगतानाच या मेळाव्यात सगळ्यांचा समाचार घेणार असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. तेव्हा मला जे बोलायचे आहे ते मी बोलेनच. आतापर्यंत मुख्यमंत्रिपदाचा मास्क तोंडावर असायचा, त्यामुळे जरा जपूनच बोलावे लागायचे. यंदा मात्र जे सुचेल, जे बोलायचे ते मी बोलेन, असेही ठाकरे म्हणाले.
मूठभर चालतील; पण निष्ठावंत हवेत बोली कितीही लागली तरी पक्षनिष्ठा विकली जात नसते. त्यामुळे गद्दारांपेक्षा मूठभर निष्ठावंत हे अधिक चांगले, असा टोला शिंदे गटाला हाणत उद्धव म्हणाले, शिवसेनेची एकूण टीम वाढवायची आहे. आता जे सोबत आहेत ते कट्टर, कडवट शिवसैनिक उरले आहेत. वेळ लढाईची आहे. शिवसेना संपवण्याची खेळी भाजपने सुरू केली आहे. पण शिवसेना ही काही आपली खासगी मालमत्ता नाही. मूठभर निष्ठावंतांच्या भरवशावर जिंकू मात्र आम्हीच. मुख्यमंत्रिपद देखील माझी व्यक्तिगत मालमत्ता नव्हती. गद्दारांनी मला सांगितले असते तर मी क्षणात पद सोडले असते. तेव्हाही आपल्याकडे 30-40 आमदार होतेच. मला मुख्यमंत्रिपदावर चिकटून राहायचे असते, तर मी त्यांनाही डांबून ठेवू शकलो असतो. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्याशी माझीही ओळख होतीच. मी घेऊन गेलो असतो सगळ्यांना कोलकात्याला, तिकडे कालिमातेच्या मंदिरात नेले असते. राजस्थानला कुठे तरी नेता आले असते; पण तो माझा स्वभाव नाही. राहायचे असेल तर निष्ठेने, मनात शंका-कुशंका घेऊन राहण्याला अर्थ नाही. मी सगळ्यांना तेव्हाच सांगितले, दरवाजा उघडा आहे, राहायचे त्यांनी निष्ठेने राहा, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
बोली कितीही लागली तरी पक्षनिष्ठा विकली जात नसते. त्यामुळे गद्दारांपेक्षा मूठभर निष्ठावंत हे अधिक चांगले. शिवसेना संपवण्याची खेळी भाजपने सुरू केली आहे. वेळ लढायची आहे. मूठभर निष्ठावंतांच्या भरवशावर जिंकू मात्र आम्हीच.
– उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख