Latest

Water Supply Scheme : पावणे पाच कोटींची ‘ती’ पाणीपुरवठा योजना रद्द करा; साळशी ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा मंत्र्यांना विनंती

सोनाली जाधव

बांबवडे, पुढारी वृत्तसेवा : साळशी (ता. शाहूवाडी) येथील शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर पावणे पाच कोटी रुपये खर्चाची नवीन पाणीपुरवठा योजना (Water Supply Scheme) अनावश्यक आहे. प्रत्यक्षात ग्रामस्थांवर दरडोई खर्चाचा भार वाढविणारी सदरची योजना रद्द करावी, अशी विनंती पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे स्थानिक ग्रामपंचायतीने लेखी पत्राद्वारे केली आहे. कार्यरत योजनेद्वारे गावकऱ्यांना पुरेसा मुबलक पाणीपुरवठा होत असल्याने शासनाच्या निधीचा अपव्यय टाळण्यासाठी संबंधित विभागाने प्रस्तावित योजना रद्द करण्याची विनाविलंब कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांनी दिली आहे.

Water Supply Scheme : ग्रामस्थांना न परवडणारी योजना 

दरम्यान, संबंधित विभागाचे प्रधान सचिव, मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे तसेच मुख्य कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद कोल्हापूर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या पत्रासोबत संलग्न १६ जानेवारीच्या विशेष मासिक सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आलेल्या सदर अनावश्यक पाणीपुरवठा योजना रद्द करण्याबाबतच्या ठरावाची प्रत सादर केल्याचेही बोरगे यांनी सांगितले. साळशी, भोसलेवाडी, पोवारवाडी या संलग्न गावांसाठी शासनाच्या जलजीवन मिशन योजना (२०२२-२३) अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे ४ कोटी ८० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, यासाठी पूर्व प्रक्रियेत स्थानिकांना विश्वासात घेतलेले दिसत नाही. यामुळे योजनेचे मुख्य उद्दिष्टच लोकांना अवगत झालेले नाही. एकतर्फी योजनेतून वाढीव १२० टक्के अतिरिक्त पाणीपट्टी भरण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. साहजिकच पदाधिकाऱ्यांना नागरिकांचा रोष पत्करावा लागत आहे.

सध्याची कार्यरत स्वजलधारा योजना सुस्थितीत आहे. प्रस्तावित योजनेच्या प्रमाण तुलनेप्रमाणे प्रति माणसी ५५ लिटर पाणी पुरवठा होत आहे. शिवाय विद्यमान पाणीपट्टी, घरफाळा कराची थकबाकी पाहता प्रस्तावित योजनेचे व्यवस्थापन करणे ग्रामपंचायतीला शक्य नाही. अशा आशयाचा मंजूर ठराव जोडून  सदरची नवीन पाणीपुरवठा योजना रद्द करण्याची विनंती संबंधित मंत्रीमहोदय तसेच प्रधान सचिवांना करण्यात आली आहे.

"तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे पाठपुरावा करून गावासाठी ८० लाख रुपये खर्चाची नळपाणी योजना मंजूर झाली होती. टेंडर प्रक्रिया आणि वर्क ऑर्डर नुसार हे काम सुरूही झाले होते. प्रत्यक्षात १० लाख रुपये खर्च झाला आहे. या अल्प खर्चाच्या उपयुक्त योजनेला खो घालून एकतर्फी लादली गेलेली अनावश्यक पाणी योजना ग्रामस्थांनी नाकारली आहे."

            विजय बोरगे (माजी जिल्हा परिषद सदस्य)

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT