Latest

धरणांमधील पाणीसाठा 17 टक्क्यांनी कमीच

अमृता चौगुले

पुणे : 'अल निनो'च्या प्रभावामुळे या वर्षी राज्याच्या बहुतांश भागांत पावसाळ्याच्या सीझनमध्ये पावसाने दिलेली हुलकावणी, मोजके दिवस पावसाची हजेरी, याचा परिणाम राज्यात असलेल्या धरणाच्या पाणीसाठ्यावर झाला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे या वर्षी राज्याच्या सहा विभागांतील धरणांचा पाणीसाठा मागील वर्षापेक्षा 17. 76 टक्क्यांनी कमी झाला आहे. या वर्षी केवळ 73.10 टक्के पाणीसाठा असून, मागील वर्षी किमान 90.86 टक्के पाणीसाठा धरणांमध्ये होता. त्यामुळे 'पाणीतूट' लक्षणीय जाणवणार आहे.

विशेष म्हणजे, राज्यातील 7 धरणांंमध्ये 0 टक्के (मृतसाठ्याच्याही खाली) पाणी असून, 16 धरणांंची पाणीपातळी 100 टक्के आहे. राज्यात जलसंपदाचे नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण असे सहा विभाग आहेत. या सहा विभागांच्या अंतर्गत 2 हजार 595 लहान, मध्यम आणि मोठी धरणे आहेत. या धरणांवर राज्यातील शेती, पिण्यासाठी पाणी तसेच उद्योगधंद्यांना पाणीपुरवठा करण्यात येतो.

जून महिना पूर्णत: कोरडा गेला, तर जुलै महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात आठ ते दहा दिवस पावसाने हजेरी लावली. त्यानंंतर ऑगस्ट महिन्यातही पावसाने उघडीप दिली आणि सप्टेंबरमध्ये थोडाफार पाऊस पडला. विशेष म्हणजे, या वर्षी मान्सूनने सरासरीपेक्षा 8 ते 10 दिवस आधीच राजस्थानच्या पश्चिम भागातून परतण्यास सुरुवात केली, तर महाराष्ट्रातून देखील वेळेच्या आधीच पाऊस परतला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागांत पावसाने ओढ दिली. त्यामुळे पाण्याची तूट जाणवू लागली आहे. विशेषत: मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही दाहकता जास्त असण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी याच काळात जलाशयांमध्ये 90.86 टक्के साठा होता. मात्र, यंदा त्यामध्ये तब्बल 17 टक्क्यांनी कमी पाणीसाठा धरणांमध्ये आहे. राज्यात सर्वांत जास्त 90.30 टक्के कोकणात, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 39.64 टक्के इतका सर्वांत कमी जलसाठा आहे. मागील वर्षी या भागात 89.73 टक्के एवढा पाणीसाठा होता. विदर्भात या वर्षी पावासाने हजेरी लावली आहे.

त्यामुळे नागपूर विभागात 79.91 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षी 86.92 टक्के इतका पाणीसाठा होता. याशिवाय अमरावती भागात मागील वर्षी 96.26 टक्के इतका पाणीसाठा होता. या वर्षी 82.27 टक्के एवढा पाणीसाठा आहे. पुणे विभागात मागील वर्षी 92.33 टक्के एवढा पाणीसाठा होता. या वर्षी 78.75 टक्के इतका पाणीसाठा आहे. नाशिक विभागात मागील वर्षी 89.11 टक्के पाणीसाठा होता. सध्या 77.68 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

या धरणांमध्ये 100 टक्के साठा

अर्जुनावटी ( यवतमाळ)
डोंगरगाव (बीड)
वांगदरी (बीड)
अरूड (के. टी. वेअर) (धाराशीव)
गुंजारा (धाराशीव)
तगरखेडा (उस्मानाबाद)
अप्पर तापी हतनूर (जळगाव)
भम डॅम (नाशिक)
भगवती (नाशिक)
निरा देवघर (पुणे)
वडज (पुणे)
घोड (पुणे)
भाटघर (पुणे)
पानशेत (पुणे)
धामणी (पालघर)
कोंडस (पालघर)

या सात धरणांत शून्य टक्के पाणीसाठा (मृत पाणीसाठा)

1) खडकपूर्णा (बुलडाणा)
2) माजलगाव (बीड)
3) शिरसमार्ग (बीड)
4) हिरादपुरी (नांदेड)
5) किल्लारी (लातूर)
6) राजेगाव (धाराशीव)
7) सिना कोळेगाव (धाराशीव)

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT