Latest

कोल्हापूर : एकजुटीच्या वादळाने उद्ध्वस्त करू, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा इशारा

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : संपात फूट पाडाल तर खरबदार, कर्मचारी, शिक्षकांच्या एकजुटीच्या वादळाने उद्ध्वस्त करू, असा इशारा राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी बुधवारी राज्य सरकारला दिला. बेमुदत संपाच्या दुसर्‍या दिवशी टाऊन हॉल बागेत सरकारविरोधी निदर्शने करण्यात आली. कितीही कारवाई करा, त्याची तमा बाळगणार नाही, असा निर्धारही यावेळी संपकर्‍यांनी केला. दरम्यान, कामावर जाण्याच्या प्रयत्न करणार्‍या काही कर्मचार्‍यांना रोखण्यात आले.

संपाच्या दुसर्‍या मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून कर्मचारी, शिक्षक मोठ्या संख्येने टाऊन हॉल उद्यानात जमा होत होते. यावेळी 'एकच मिशन-जुनी पेन्शन' असा नारा देत, कर्मचार्‍यांनी सरकारविरोधी निदर्शने केली. यावेळीही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आम्ही कारवाईची तमा बाळगणार नाही, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कितीही कारवाई करा, आम्ही घाबरणार नाही, मागे हटणार नाही, असा निर्धार कर्मचार्‍यांनी केला.

नर्सिंग फेडरेशनच्या संजीवनी दळवी म्हणाल्या, हा आता वणवा पेटला आहे. जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही, तोपर्यंत तो शमणार नाही. खासगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे भरत रसाळे म्हणाले, संपात फूट पाडू नका, आमचा अंत पाहू नका. 'सिटू'चे सुभाष जाधव म्हणाले कर्मचारी, शिक्षकांच्या एकजुटीने वादळ निर्माण झाले आहेे. राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हा समन्वयक अनिल लवेकर म्हणाले, जोपर्यंत जुन्या पेन्शनचा निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. यावेळी शिवसेना शिक्षक सेनेचे अरुण मुजुमदार, जुनी पेन्शन कोअर कमिटीचे श्रीधर गोंधळी, राजपत्रिपत अधिकारी महासंघाच्या पूनम पाटील, नर्सिंग फेडरेशनच्या श्रीमंती पाटील, हाशमत हावेरी आदींनी भावना व्यक्त केल्या.

…तर सीपीआरसमोर ठिय्या मारू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने 13 परिचारिकांची रजा रद्द करून तत्काळ कामावर हजर राहण्याचे आदेश दिले. यामध्ये 11 परिचारिका बालसंगोपनाच्या रजेवर तर दोन अर्जित रजेवर होत्या. या परिचारिका कामावर हजर झाल्या आणि संपात सहभागी होत असल्याचे सांगत बाहेर पडल्या. त्यांनी काम करावे, यासाठी दडपशाही सुरू असल्याची माहिती मिळताच समन्वय समितीचे अनिल लवेकर, संजय क्षीरसागर आदींसह शिष्टमंडळ सीपीआरमध्ये अधिष्ठाता यांना भेटण्यासाठी गेले. मात्र, वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट झाली नाही. जर अशा प्रकारे दडपशाही करणार असाल तर टाऊन हॉल बागेतील सर्व संपकरी कर्मचारी तुमच्या दारात आणून बसवू, सीपीआरमध्येच ठिय्या मांडू, असा इशारा वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आला.

कामावर हजर राहणार्‍या कर्मचार्‍यांना 'बांगड्यां'चा आहेर

संपात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मात्र, काही कार्यालयात, काही कर्मचारी अधून-मधून जाऊन काही काम करत असल्याची माहिती मिळताच, संबंधित कार्यालयात आंदोलकांतील काही जणांना पाठविण्यात येत होते. अशा कर्मचार्‍यांसाठी 'बांगड्या'ही सोबत नेल्या होत्या. अत्यावश्यक सेवा वगळून जर कोणी कामावर हजर राहत असतील तर त्यांनाही धडा शिकवू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT