David Warner  
Latest

David Warner : वॉर्नरची 100 व्या कसोटीत शतकी खेळी! 8000 धावाही केल्या पूर्ण

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन डेस्क:

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने त्याची 100 वी कसोटी संस्मरणीय बनवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. द. आफ्रिकेविरद्ध सध्या सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत त्याने 29 डाव आणि 1089 दिवसांनी आपल्या शतकाची दीर्घकाळ प्रतीक्षा संपुष्टात आणली. एमसीजीवर त्याने आपले 25 वे कसोटी शतक झळकावून 8000 धावांचा टप्पा पार केला.

100 व्या कसोटीत शतक झळकावणारा 10 वा फलंदाज

वॉर्नर हा 100व्या कसोटीत शतक झळकावणारा जगातील 10 वा तर दुसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे. यासह वॉर्नर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या सक्रिय खेळाडूंच्या यादीत विराट कोहली (72) नंतर दुसऱ्या क्रमांकावर पोचला आहे. वॉर्नरच्या नावावर 45 शतकांची नोंद झाली आहे. त्याच्यानंतर जो रूटचा (44) क्रमांक लागतो.

8000 धावा पूर्ण

मेलबर्न कसोटीत उतरण्यापूर्वी वॉर्नरला आठ हजारांचा आकडा गाठण्यासाठी 78 धावांची गरज होती. बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी त्याने 8000 धावांचा टप्पा पूर्ण केला आणि आणखी एक मोठी उपलब्धी आपल्या नावावर नोंदवली. अशी कामगिरी करणारा डावखुरा फलंदाज वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा आठवा खेळाडू ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज खेळाडू रिकी पॉन्टिंग, अॅलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ, मायकेल क्लार्क, मार्क वॉ या दिग्गजांच्या क्लबमध्ये धडक मारली आहे.

जवळपास 3 वर्षांनी शतक

बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी वॉर्नर फॉर्ममध्ये नव्हता असं नाही, पण कसोटी शतक त्याला सातत्याने हुलकावणी देत होते. जानेवारी 2020 मध्ये 24 वे कसोटी शतक झळकावणाऱ्या वॉर्नरला त्याचे 25 वे शतक गाठण्यासाठी जवळपास 3 वर्षे लागली. यादरम्यान त्याने 4 अर्धशतके झळकावली, ज्यामध्ये तो 90 धावा पर्ण केल्यानंतर दोनदा बाद झाला. पण आपल्या 100 व्या कसोटीत वॉर्नरने पूर्ण तयारीने मैदानात उतरला आणि कोणतीही चूक न करता त्याने कसोटी क्रिकेटमधील शतकाचा दुष्काळ संपवला.

100व्या कसोटीत शतक झळकावणारे फलंदाज

कॉलिन काउड्री (इंग्लंड) – 1968

जावेद मियाँदाद (पाकिस्तान) – 1989

गॉर्डन ग्रीनिज (वेस्ट इंडीज) – 1990

अॅलेक स्टुअर्ट (इंग्लंड) – 2000

इंझमाम-उल-हक (पाकिस्तान) – 2005

रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – 2006

ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका) – 2012

हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका) – 2017

जो रूट (इंग्लंड) – 2021

डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – 2022

रिकी पाँटिंग हा जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याने आपल्या 100 व्या कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावली आहेत. तर पाहिल्या आणि शंभराव्या कसोटीत शतक पूर्ण करणारा जावेद मियाँदाद हा एकमेव खेळाडू आहे.

वॉर्नरचे 100 व्या वन डेतही शतक

वॉर्नरने यापूर्वी त्याच्या वन डे कारकिर्दीतील 100 व्या सामन्यातही शतक ठोकले आहे. 2017 मध्ये, वॉर्नरने बंगळुरूमध्ये भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात शतकीखेळी साकारली होती. याचबरोबर तो 100 व्या कसोटी आणि 100 वन डे सामन्यात शतक झळकावणारा जगातील दुसरा फलंदाज बनला आहे. वॉर्नरपूर्वी केवळ गॉर्डन ग्रीनिजने असा पराक्रम केला आहे. ग्रीनिजने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 100 वा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला आणि शतक पूर्ण केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT