वर्धा; पुढारी वृत्तसेवा : वर्धा जिल्ह्यातील राजणी याठिकाणी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार पहायला मिळाला. राजणी येथे अमरावती नागपुर राष्ट्रीय महामार्गावर उभा ट्रक अचानक आग लागल्याने जळाला. शुक्रवारी (दि. ६) रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत ट्रकमध्ये असलेले कोंबड्याचे खाद्य जळून खाक झाले. यात २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
मालेगाव येथून नागपूरकडे कोंबड्यांचे खाद्य घेऊन ट्रक जात होता. वाटेत भूक लागल्याने कारंजा तालुक्यातील राजनी येथे रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून चालक व क्लिनर हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले. दरम्यान, काही क्षणातच ट्रकच्या कॅबिनला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीत ट्रकची केबिन पूर्णतः जळून खाक झाली तर ट्रकमध्ये असलेले खाद्य जळाले. या घटनेची माहिती कारंजा पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले.
आग विझवण्यासाठी टोल प्लाझा वरील टँकर पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत ट्रक व खाद्य जळून खाक झाले होते. घटनेत ट्रक आणि खाद्याचे मोठे नुकसान झाले.