Latest

वर्धा : ‘रूफ टॉप सोलर’मधून वीज बिलात बचत

Shambhuraj Pachindre

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : घराच्या छपरावर सौरऊर्जानिर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली तर महावितरणला द्यायची या 'रूफ टॉप सोलर', योजनेला ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे. महावितरणच्या कार्यक्षेत्रात राज्यभरातील एकूण 1 लाख 40 हजार 808 सोलर रुफटॉपपैकी वर्धा जिल्ह्यातील 2 हजार 653 ग्राहकांनी रुफ टॉप सोलर यंत्रणा बसवून पर्यावरणपुरक वीजनिर्मिती करीत वीजबिलातही भरघोस बचत सुरू केली आहे.

रूफ टॉफ सोलरची राज्यातील संख्या 1 लाख 40 हजार 808 इतकी असून त्यांची स्थापित क्षमता तब्बल दोन हजार 53 मेगावॉट आहे. त्यात एकट्या नागपूर जिल्ह्यातील 24 हजार 357 रुफ टॉपचा समावेश असून त्यांची विद्युत निर्मिती स्थापित क्षमता 251 मेगावॉट आहे. नागपूर परिमंडलातील वर्धा जिल्ह्यातील 2 हजार 653 रुफ टॉप ग्राहकांसह परिमंडलातील एकूण 27 हजार 10 ग्राहकांनी त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती सुरु केली आहे. राज्यातिल एकूण सोलर रुफ टॉप मध्ये नागपूर परिमंडलाचा वाटा 19.18 टक्के आहे.

सात वर्षांपूर्वी राज्यामध्ये केवळ 1 हजार 74 ग्राहकांकडून 20 मेगावॉट सौरऊर्जा रूफ टॉप पद्धतीने निर्माण होत होती. मागील सात वर्षांत त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. एकूण ग्राहकांची संख्या 1 लाख 40 हजार 808 इतकी झाली आहे, मागील वर्षी ही संख्या 76 हजार 808 इतकी होती.

यातून सौरऊर्जा निर्मितीची क्षमता एक हजार 860 मेगावॉट होती. एकट्या नागपूर जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात तब्बल 10 हजार 94 ग्राहकांनी 82 मेगावॅट स्थापित वीजनिर्मिती करणाऱ्या रूफ टॉप संचाची स्थापना केली आहे. सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या विजेमुळे ग्राहकाचा नेहमीपेक्षा कमी वीज वापर होतो, त्यामुळे वीजबिलात देखील कपात होते.

याशिवाय ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली, तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते. यातून कधी कधी ग्राहकांना शून्य रकमेचे वीज बिलही येते. सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो.

छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पात निर्माण झालेली वीज घरामध्ये वापरायची, प्रकल्पात गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यामुळे वीजबिल शून्य येते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला देया येते, अशी ही योजना आहे. सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांनाही आर्थिक लाभ होतो. ग्राहकाच्या वीज आणि पैसे बचतीसोबतच पर्यावरण पुरक असलेल्या पंतप्रधान सुर्यघर- मुफ्त बिजली योजनेत सहभागी होऊन महावितरणच्या रुफ़ टॉप सोलर योजनेचा लाभ अधिकाधिक ग्राहकांनी घेण्याचे आवाहन महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT