Latest

मी शिवाजी पार्क!

Arun Patil

विवेक गिरधारी

शिवतीर्थावर यापूर्वी स्वातंत्र्यवीर आणि तत्कालीन हिंदुहृदयसम्राट विनायक दामोदर सावरकरांचे अंत्यसंस्कार झाले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळही याच मैदानात एका बाजूला आहे. आता स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा देहदेखील शिवतीर्थावरच विसावला. आता मात्र कुठेतरी पूर्णविराम द्यावा लागेल. शिवाजी पार्कची स्मशानभूमी करू नका, अशी भूमिका ज्येष्ठ नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मोठ्या धाडसाने मांडली. तिचे स्वागत केले पाहिजे. अन्यथा शिवतीर्थाचे 'वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे' होईल.

आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली, श्रद्धांजली न विसरता अर्पण करतो, अशा आदरांजलीचे एखादे ट्विट काँग्रेसचे नेते राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांना करायला सांगा, असे आव्हान भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी गेल्याच महिन्यात शिवसेनेला दिले होते. शिवसेना आणि भाजप राजकीय, सांस्कृतिकद़ृष्ट्या कसे एका कुळातले आहेत आणि सत्तेसाठी दोन्ही काँग्रेसच्या नादी लागून शिवसेना कशी कुळाचार विसरली, हे भाजपला सांगायचे होते.

शिवसेनेला राजकीय कूळधर्माची आठवण करून देण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. गेल्या 23 जानेवारीची ही संधीही भाजपने साधली. यातून भाजपच्या नेत्यांची शिवसेनाप्रमुखांवर कशी श्रद्धा आहे, हेच दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडून सतत होत आला. त्यावर शिवसेनेने किती विश्वास ठेवला या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले. शिवसेनाप्रमुखांना प्रसंगानुसार आदरांजली वाहण्यासाठी जाणारी ही नेतेमंडळी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळाकडे तिरप्या नजरेने पाहतात आणि आदरांजलीही वाहतात.

भारतरत्न लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी झाली. या गर्दीतही लतादीदींना श्रद्धांजली अर्पण करता करता या मंडळींनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळाकडे तिरप्या नजरेने पाहून घेतलेच! लतादीदींच्या चितेची धग शांत होण्याच्या आधीच त्यांचे अंत्यविधी जिथे झाले त्याच जागेवर लतादीदींचे स्मारक उभारा, अशी मागणी आमदार राम कदम यांनी केली. कदम हे तसे भाजपचे प्रमाणित नेते नव्हेत.

ते मुख्य प्रवक्तेदेखील नाहीत, तरीही लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कवर अंत्यविधीच्या ठिकाणीच उभारण्याची त्यांनी केलेली मागणी राजकीय खळबळ उडवून गेली. ही मागणी म्हणजे शिवसेनेला धर्मसंकटात टाकण्याचीच खेळी होती. या स्मारकाला विरोध करावा, तर शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळाची आठवण लोक करून देणार. दीदींच्या स्मारकासाठी शिवाजी पार्कवर जागा देण्याची घोषणा करावी, तर हे मैदानच हातून जाण्याची भीती. शिवाय सेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरचा रोष पत्करावा लागेल तो वेगळाच. त्यामुळे भाजपला नेहमी तोडीस तोड जवाब देणारे सेनेचे नेते संजय राऊतही थोडे गडबडलेच.

लतादीदींच्या स्मारकाचा देशपातळीवर विचार करावा लागेल, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न जरूर केला; मात्र भाजपने या स्मारकाच्या मागणीआडून सेनेवर तिरंदाजी सुरूच ठेवली. मोठ्या कोंडीत सापडलेल्या शिवसेनेच्या मदतीला अनपेक्षितरीत्या धावले ते वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर. वंचितचे बाळासाहेब तसे दादरचे शेजारी.

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कॉलनीतील राजगृहात ते राहतात. भाजपच्या मागणीवर त्यांनी आपल्या निःसंग शैलीत जी प्रतिक्रिया दिली ती फार कौतुकास्पद म्हणावी. अशाप्रसंगी इतके स्पष्ट आणि रोखठोक बोलणे भल्याभल्या नेत्यांना जमत नाही. ते आंबेडकर बोलून गेले. म्हणाले, 'शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच राहू द्या. शिवाजी पार्कची स्मशानभूमी करू नका. या पार्कच्या बाजूलाच शिवाजी पार्क नावाचीच मोठी स्मशानभूमी आहे. त्यामुळे या मैदानाची स्मशानभूमी करण्याची गरज नाही…'

यानिमित्ताने लंडनचे वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे आठवले. हे मोठे ऐतिहासिक चर्च असले, तरी येथे फक्त राजघराण्यातील व्यक्तींचा आणि नंतर अभिजनांचाच दफनविधी केला जातो. कालांतराने साहित्य-संस्कृती-विज्ञान आणि संशोधनात अफाट योगदान देणार्‍या महान व्यक्तींचे मृतदेहदेखील याच चर्चमध्ये विसावण्यास सुरुवात झाली.

थोर शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन इथेच चिरविश्रांती घेतोय. मानवाच्या उत्क्रांतीचे भाष्य करणार्‍या चार्ल्स डार्विनची कबरही इथेच आहे. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे, तर अवकाशाचा सतत वेध घेणारा शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग्जदेखील याच वेस्टमिन्स्टर अ‍ॅबेत थोरामोठ्यांच्या रांगेत अखेरची जागा मिळवून गेला.

सार्वजनिक कर्तृत्व हाच निकष असेल, तर मुंबईतही कर्तृत्ववान माणसांची कमी नाही. उद्या याच सर्व कर्तबगार माणसांचा अंत्यविधी शिवाजी पार्कवरच करायचा ठरवला तर मोठा राजकीय इतिहास, सांस्कृतिक इतिहास असलेले हे मैदान अभिजनांची स्मशानभूमी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे शिवाजी पार्कचे 'वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे' होईल!

शिवसेनाप्रमुखांनी याच मैदानावर शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली. मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढे उभारले. शिवसेनेचा इतिहास लिहिताना शिवाजी पार्क वगळता येत नाही. शिवसेनाप्रमुख शिवाजी पार्कला आवर्जून शिवतीर्थ म्हणत. या शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांवर अंतिम संस्कार झाले आणि मैदानाच्या एका बाजूला त्यांचे स्मृतिस्थळ आजही मराठी माणसाला प्रेरणा देत आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या अगोदर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अंत्यसंस्कार शिवाजी पार्कवर झाले होते. त्यांचे स्मारक मात्र मैदानाच्या बाहेर रस्त्याच्याही पलीकडे उभारले गेले. सावरकरांनाही हिंदुहृदयसम्राट संबोधले जात असे. म्हणजे दोन हिंदुहृदयसम्राटांचे देह या मैदानावर पंचत्वात विलीन झाले. आता स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा देहदेखील शिवतीर्थावर विसावला. याला कुठेतरी पूर्णविराम द्यावा लागेल. शिवाजी पार्कवरील अंत्यसंस्कार म्हणजे बहुमान ही परंपरा होऊ नये.

या मैदानावर सतत राजकीय आक्रमणे होत आली आणि दादरकरांनी ती परतवून लावली. या संघर्षांचाही एक चित्रपट 'मी शिवाजी पार्क'मध्ये रूपेरी पडद्यावर झळकून गेला. आता आणखी संघर्ष नको. शिवतीर्थाला शांतपणे जगू द्या, श्वास घेऊ द्या. शिवाजी पार्कची स्मशानभूमी करू नका. ते मुलांचे खेळण्याचे मैदान आहे. विविध संघांच्या स्पर्धा याच मैदानावर होतात. वेगवेगळे क्लब इथेच झुंजतात. संध्याकाळी चालणार्‍या, बोलणार्‍या माणसांनी मैदान फुलून जाते. म्हणजे हे शिवतीर्थ माणसांचाच श्वास घेत जगते. म्हणून कुणाहीसाठी या शिवतीर्थाला स्मशानकळा येऊ नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT