संग्रहित छायाचित्र 
Latest

राज ठाकरे यांचा संघर्ष अस्तित्वाचा!

Arun Patil

विवेक गिरधारी

मराठी माणसाने साथ देऊ नये, असे राज ठाकरे यांनी मराठीचे कोणते घोडे मारले होते? 2014 पासून मराठी माणसाने मनसेकडे फक्त पाठच फिरवली आणि राज ठाकरेंसमोर अस्तित्वाचा संघर्ष उभा केला. स्वत:ला टिकवण्यासाठी राज राष्ट्रवादीकडे जाऊन आले आणि आता भाजपच्या जवळ जाऊ पाहत आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष असा आहे की, जो प्रत्येक मराठी माणसाला चालवावासा वाटतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध धाडसी बंड करून राज ठाकरे यांनी हा पक्ष काढला, नावारूपाला आणला; मात्र मनसेने काय करावे आणि काय करू नये, याची एक आचारसंहिता मराठी माणसाने सतत आपल्यापुरती तयार ठेवली. जेव्हा जेव्हा राज ठाकरे यांचे वागणे, बोलणे या आचारसंहितेच्या विपरीत दिसले तेव्हा तेव्हा त्यावर महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तसे म्हटले, तर महाराष्ट्रात अमराठी असा कोणताही पक्ष नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी अगदी भाजपही अमराठी नाही. या मराठी मातीतच हे पक्ष उभे राहिले आणि वाढले.

शिवसेना तर मराठीचे बाळकडू घेऊनच जन्माला आली. जन्मापासून शिवसेना मराठी हक्कांसाठीच लढत आली, तरीही आज आशा बाळगावी असा एकमेव पक्ष म्हणून मराठी माणूस मनसेकडेच पाहतो. मराठी माणसाला जणू दुसरा कोणताही आधार नाही. मनसेचा उरलासुरला आधारही हातून गेला, तर आपली या बहुभाषिक राजकारणाकडे झुकत चाललेल्या महाराष्ट्रात धडगत नाही, अशी भीती मराठी माणसाला वाटते. या भीतीतूनच मराठी माणूस मनसेबद्दल कमालीचा संवेदनशील झाला.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप आणि आता शिवसेना हे सारेच पक्ष मराठी माणसाबद्दल, मराठी माणसांच्या हक्कांबद्दल जसे जसे बोथट होत गेले, तसा मराठी माणूस मनसेबद्दल अधिकाधिक संवेदनशील होत गेला. मराठी माणूस आणि मनसे यांच्यात निर्माण झालेले हे नाते खुद्द राज ठाकरे यांना किती समजले? गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांचे भाषण मराठी माणसाला म्हणूनच प्रचंड निराश करून गेले.

खरे तर, राज ठाकरे आता मराठी माणसावर सूड घेण्याचे राजकारण करू लागले आहेत, असे दिसते. हा सूड कशाचा? मनसेचा झेंडा अधिक भगवा केला तिथपासून मनसेचे हे नवनिर्माण पूर्णपणे हिंदुत्ववादी वळणावर जाऊन पोहोचले. मनसेने मराठीचा हटवाद सोडावा आणि कडवट हिंदुत्ववादी व्हावे, अशी अट जणू भाजपने घातली आणि ती पूर्ण करण्यासाठी राज ठाकरे कामाला लागलेले दिसतात. लोक म्हणतात, राज ठाकरे यांची अवस्था राजकीय फेरीवाल्यासारखी झाली आहे. आधी ते स्वतंत्र मराठी बाणा घेऊन उभे होते. मग, ते मोदीसमर्थक बनले. मात्र, मोदीलाटेत आकार, उकार घेऊ लागलेली मनसेची गणिते उद्ध्वस्त होताच ते मोदीविरोधक झाले. मग, त्यांना वाटले की, राष्ट्रवादी काँग्रेस हात देईल.

ज्या शरद पवारांना राज ठाकरे आज जातीयवादाचे जनक ठरवतात, त्या पवारांची मुलाखतही त्यांनी मोठी वाजत-गाजत घेतली. ठाकरेंचा हा पुतण्या पवारकाकांना मोठ्या प्रेमाने हात धरून व्यासपीठावर बसवताना महाराष्ट्राने पाहिला. हे त्या त्या क्षणाचे प्रसंग नसतात. सारे नेपथ्य ठरलेले असते. पुढे राष्ट्रवादी आणि ओघानेच काँग्रेसला फायदा होईल, अशा काही मोजक्या सभाही राज यांनी घेतल्या. राजकीय फिरवाफिरवीची सुरुवात महाराष्ट्रात अशी झाली. गुढीपाडव्याच्या भाषणात राज म्हणाले, 'महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष भाजप, दोन नंबरचा पक्ष शिवसेना आणि तीन नंबरचा पक्ष राष्ट्रवादी.

यातला तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरच्या पक्षांना फिरवतोय…' यातल्या कोणत्याही नंबरच्या पक्षाशी मनसेचा संबंध काय? आजही तो नाही. कालही नव्हता, तरीही दोन्ही काँग्रेसच्या कच्छपी मनसे लागली. दोन्ही काँग्रेसच्या राजकारणाचा मनसेला कोणताही फायदा होणार नव्हता, तरीही भाजपच्या विरोधात दोन्ही काँग्रेससाठी राज ठाकरेंनी मागच्या लोकसभेच्या रणधुमाळीत प्रचारसभांचे धूमशान निर्माण केले. त्याचा फायदा काँग्रेसी पक्षांना किती झाला, तो भाग वेगळा. मनसेेचे मात्र नुकसानच झाले. केवळ मराठीचा हट्ट धरणारा पक्ष म्हणून मनसे युती करण्याच्या लायकीची नाही, असे राष्ट्रवादीतून स्पष्ट सांगण्यात आले.

दोन्ही काँग्रेसने वापरलेली मनसे आता भाजपकडून शिवसेनेविरुद्ध वापरली जाणार; पण भाजपलाही मराठीचा हटवाद जपणारी मनसे चालत नाही, चालणारही नाही; मात्र एकाच वेळी मराठी आणि हिंदुत्व अशा दोन्ही डगरींवर पाय ठेवून राजकारण करणार्‍या शिवसेनेला नामोहरम करायचे असेल, तर मनसेचे राजकीय धर्मांतर घडवले पाहिजे, असा महान विचार भाजपच्या धुरिणांना सुचला असावा. त्यातून मनसेचा बहुरंगी झेंडा बाजूला पडला. तो गडद भगवा झाला. उद्धवच्या बाजूला बसून राज म्हणू शकतील की, दादू, तुझ्या भगव्यापेक्षा माझा भगवा अधिक गडद आहे. भाजपची राजकीय गरज म्हणून मनसेने मराठीचा मुद्दा सोडला आणि हिंदुत्वाचा नारा दिला.

'हिंदुत्वाचे राजकारण म्हणजे मुस्लिमविरोधी राजकारण', हे सूत्र राज यांनी भाजपच्या आग्रहाखातरच पत्करलेले दिसते. त्यासाठी मशिदीवरील भोंग्यांचे राजकारण मनसेने सुरू केले. आधी म्हटल्याप्रमाणे मनसेवर ही वेळ मराठी माणसानेच आणली. मराठी माणूस मराठीच्या मुद्द्यावर कडवटपणे मतदान करत नाही. 2009 मध्ये पहिल्या झटक्यात राज ठाकरेेंचे 13 आमदार निवडून आले. तेव्हा शरद पवारही चकित झाले होते. 2012 मध्ये मनसेची नाशकात सत्ता आली आणि पुण्यात तर हा नवा कोरा पक्ष विरोधी बाकावर प्रमुख भूमिकेत बसला; मात्र 2014 पासून आलेल्या मोदी लाटेत नाशिक, पुणे भाजपने जिंकले.

मुंबईदेखील भाजपने जवळजवळ जिंकली होती. युतीचे राज्य जपायचे म्हणून भाजपने शिवसेनेला मोठा भाऊ मानले आणि मुंबई सेनेकडे राहिली. 2019 मध्ये राज यांनी मोदींविरोधात 'लाव रे तो व्हिडीओ' मोहीम राबवली. त्याचा मतदानात मात्र परिणाम झाला नाही. पुढच्या विधानसभेला मनसेचा एकमेव आमदार निवडून आला. मराठी माणसाने साथ देऊ नये, असे राज यांनी मराठीचे कोणते घोडे मारले होते? 2014 पासून मराठी माणसाने मनसेकडे फक्त पाठच फिरवली आणि राज ठाकरेंसमोर अस्तित्वाचा संघर्ष उभा केला.

स्वत:ला टिकवण्यासाठी राज राष्ट्रवादीकडे जाऊन आले आणि आता भाजपच्या जवळ जाऊ पाहत आहेत. यात जितके नुकसान राज यांचे तितकेच मराठी माणसाचे. याचे कारण दुसर्‍याला बाटवल्याशिवाय काही धर्म विस्तारत नाहीत. त्याचप्रमाणे राजकीय बाटवणूक करून राजकीय धर्मविस्तार करण्याच्या तडाख्यात मनसे सापडली असेल, तर महाराष्ट्रधर्माला जागे व्हावे लागेल. महाराष्ट्राला आपला राजधर्म – मराठी धर्म सोडून चालणार नाही. राज ठाकरे यांनी आपला हा धर्म ओळखला, तर मराठी माणसाविरुद्ध त्यांनी सुरू केलेले राजकीय धर्मांतराचे हे सुडाचे राजकारण ते थांबवतील. अजूनही मराठी माणसाने आशा सोडलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT