न्यूयॉर्क : 'दिसतं तसं नसतं' हे खरेच आहे. आता या छायाचित्रात मांडीवर बसलेली चिमुकली पाहिल्यावर ती किती वर्षांची आहे असे वाटते? अनेक लोकांना ती चार वर्षांची आहे असे वाटू शकते, वास्तवात ती 19 वर्षे वयाची आहे! या मुलीचे नाव डॅनिया शबीर.
डॅनिया शबीर हिला 'क्रोमोझोम ट्रान्सलोकेशन' नावाचा विचित्र आणि दुर्धर आजार आहे. हा आजार असलेली ती बहुधा जगातली एकमेव व्यक्ती असेल. डॅनिया मनानं 'टीनएजर' आहे; पण तिची उंची आणि वजन 4 वर्षांच्या मुलीइतकं आहे. तिचं वजन केवळ 17 किलो असल्यानं ती छोटीच दिसते. डॅनियाची आई अलिशा आणि तिची आत्या तिचा सांभाळ करतात; मात्र लोकांच्या उलटसुलट बोलण्यानं त्यांना अनेकदा त्रास होतो. त्यांच्या कुटुंबातल्या व इतर काही व्यक्ती सोडल्यास कोणीही त्यांची सत्य परिस्थिती समजून घेत नाही.
डॅनियाची संपूर्ण जेनेटिक चाचणी केल्यावर डॉक्टरांना लक्षात आलं, की क्रोमोझोम 20 मध्ये झालेल्या 'ट्रान्सलोकेशन'मुळे तिला हा आजार झाला आहे. आतापर्यंत जगभरात असे केवळ 4 रुग्ण आढळले आहेत. हा आजार आतापर्यंत केवळ मुलांमध्येच झाल्याचं दिसून आले होते. डॅनिया ही अशा आजाराची पहिली स्त्री रुग्ण आहे. ज्या मुलांना हा आजार झाला होता, ते फार काळ जगू शकले नाहीत; मात्र डॅनिया गेली 19 वर्षे या आजाराशी झुंज देत आहे. तिच्या शरीराचं तापमान आणि रक्तातली साखर जन्मापासूनच इतरांपेक्षा कमी आहे. हळूहळू तिच्या आजाराची कल्पना सगळ्यांना आली. प्रत्यक्ष वयापेक्षा ती खूप लहान दिसते, त्यामुळे तिची समाजात खूप हेटाळणी होते; मात्र ती खूश राहण्याचा प्रयत्न करते. तिला घरच्यांसोबत फिरायला आवडतं. त्याने तिला खूप आनंद मिळतो.