विश्वसंचार

हिमालयातील हिमनद्या वितळताहेत १० पट वेगाने

Arun Patil

नवी दिल्ली : पृथ्वीवरील 'तिसरा ध्रुव' म्हणून ओळखण्यात येणार्‍या हिमालयातील हिमनद्या प्रचंड वेगाने वितळत आहेत. यासंदर्भात करण्यात आलेल्या संशोधनानुसार हिमालयातील हिमनद्या वितळण्याचा वेग वाढल्याने आशियातील गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू नदीकिनारी असणार्‍या भारत आणि पाकिस्तानमधील कोट्यवधी लोकांना पाण्याच्या एकेक थेंबासाठी तरसावे लागणार आहे. कारण 2000 पासून ते आतापर्यंत हिमालयातील हिमनद्या 10 पट वेगाने वितळत आहेत.

बर्फ वितळण्याचा हा वेग 'लिटल आईसएज'पासून सरासरी 10 पट जास्त आहे. 'लिटल आइसएज' हा एक असा काळ होता की, त्यावेळी पर्वतांवरील हिमनद्यांचा विस्तार होत होता. या काळास 14 व्या शतकास सुरुवात झाली आणि तो 19 व्या शतकाच्या मध्यावधीपर्यंत सुरू होता. मात्र, आता यासंदर्भात करण्यात आलेल्या संशोधनानुसार हिमालयातील हिमनद्या अन्य हिमनद्यांच्या तुलनेत जास्त वेगाने वितळत आहेत. यामुळे समुद्राची पातळीही वाढू लागली आहे.

हिमालयातील हिमनद्या वितळू लागल्याने गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू नदीच्या किनारी राहण्यार्‍या कोट्यवधी लोकांना भीषण अन्न व पाणीटंचाईस सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. हिमालयाला पृथ्वीवरील तिसरा ध्रुव म्हटले जाते. कारण अंटार्क्टिका आणि आर्क्टिकनंतर हिमालय हे हिमनद्यांचे तिसरे मोठे स्रोत आहे.

या संशोधनाचे लेखक डॉक्टर सिमाने कुक यांनी सांगितले, हिमालयातील बदल सध्या लोक अनुभवत आहेत. भविष्यात याचा कोट्यवधी लोकांवर परिणाम होणार आहे. दरम्यान, या संशोधनासाठी शास्त्रज्ञांच्या पथकाने सॅटेलाईट छायाचित्रांचा अभ्यास केला. यामध्ये असे आढळून आले की, हिमालयातील 40 टक्के ग्लेशियर संपले आहे. पूर्वी 28 हजार चौरस कि.मी. पसरलेले ग्लेशियर आता कमी होऊन 19,600 चौरस कि.मी. इतके कमी झाले आहे. बर्फ वितळल्याने समुद्राची पातळी 0.03 ते 0.05 इंचाने वाढली आहे.

SCROLL FOR NEXT