नवी दिल्ली : पृथ्वीवर लाखो प्रकारचे जीव आहेत. यातील काही अत्यंत लहान, मोठे, चपळ, वेगवान, विषारी आहेत. मात्र, जगात असाही एक जीव अस्तित्वात आहे की, त्याला सर्वाधिक आळशी म्हणून ओळखले जाते. स्लोथ असे त्याचे नाव. हा जीव आयुष्यातील 90 टक्के वेळ आळसात घालवतो. कधी कधी जर जीव वाचविण्यासाठी पळावयाचे झाल्यास तो ताशी 0.03 किमी इतक्या वेगाने पळतो. हा प्राणी हलला तरी ते अत्यंत हळूवारपणे.
स्लोथ हा प्रामुख्याने दक्षिण व मध्य अमेरिकेत आढळतो, तसेच तो शाकाहारी स्तनधारी प्राणी आहे. त्याच्या एकूण 6 प्रजाती असल्या तरी शास्त्रज्ञांनी त्यांना दोन जीववैज्ञानिक कुळात विभागले आहे. यातील एक म्हणजे दोन बोटांचे मेगालोनिकिडाए, तर दुसरे 3 बोटे असणारे बॅ्रडिपोडिडाए.
आळशी म्हणून बिरुदावली मिळालेला हा स्लोथ प्रामुख्याने जंगलातील झाडांवरच राहतो. असेही म्हटले जाते की, कधी काळी हा जीव समुद्रात पोहतही असे. मात्र, अशी प्रजात लाखो वर्षांपूर्वीच नष्ट झाली आहे. तो उलट्या स्थितीतच लटकून खात असतो. झाडाची पाने हेच त्याचे प्रमुख खाद्य असते. स्लोथच्या पोटात गायीसारखे चार चेंबर असतात. तसेच या प्राण्याच्या पचनाची प्रक्रिया अत्यंत संथ असते. एकदा का पाने खाल्ली की, ती पचण्यास भहिनाभराचा अवधी लागतो. तसेच पोटात एक तृतियांश पाने न पचता तशीच पडून राहतात.