विश्वसंचार

स्मार्टवॉचने दिली ‘गोड’ बातमी!

Arun Patil

न्यूयॉर्क : प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठी अनेक प्रकारच्या चाचण्या आहेत. अगदी घरगुती चाचणी करण्यासाठी प्रेग्नन्सी किटही असते ज्याच्या सहाय्याने गर्भधारणा झाली आहे की नाही हे समजू शकते. मात्र, कधी कधी अनपेक्षितपणे गर्भधारणेची खबर समजू शकते. एका महिलेला तर चक्क स्मार्टवॉचमुळे ही 'गुड न्यूज' समजली!

हल्ली बाजारात अनेक कंपन्यांचे स्मार्टवॉच उपलब्ध आहेत व त्याचा अनेक लोक विविध कारणांसाठी वापरही करीत असतात. अशा स्मार्टवॉचच्या सहाय्याने ऑक्सिजन व्हॉल्व्ह, हृदयाचे ठोके व आरोग्याशी संबंधित अनेक गोष्टी समजू शकतात. एका महिलेने आता दावा केला की अशा वॉचमुळे तिला ती गर्भवती असल्याचे समजले.

याबाबतची एक पोस्ट तिने सोशल मीडियात शेअरही केली आहे. तिने सांगितले की तिच्या हृदयाची गती सुमारे 57 होती व ती अचानक 72 पर्यंत वाढली. असे जवळपास पंधरा दिवस सुरू होते. यामागे काय कारण असावे हे जाणून घेण्याचा तिने बराच प्रयत्न केला. तिची जीवनशैली निरोगी होती आणि ती नियमितपणे व्यायामही करीत होती. मात्र, हृदयाच्या ठोक्यांच्या आकड्यांमधील हा बदल तिला त्रास देत होता. शेवटी तिने कोरोना चाचणी केली व ती निगेटिव्ह आली. तिने अन्यही अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या व त्यामधूनही काही आढळले नाही.

शेवटी तिने गर्भधारणेविषयीची चाचणी करण्याचे ठरवले. तिने सांगितले, मी वाचलं होतं की कधी कधी अशी लक्षणे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात दिसून येतात. दुसर्‍या दिवशी तिचा प्रेग्नन्सी रिपोर्ट आला व त्यामधून तिला ती गर्भवती असल्याचे समजले! त्यानंतर ती एका डॉक्टरकडेही गेली ज्यांनी ती खरोखरच गर्भवती असल्याचे सांगितले. मात्र, गर्भधारणेनंतरची कोणतीही पारंपरिक लक्षणे तिच्यामध्ये दिसून आली नव्हती. स्मार्ट वॉचमध्ये हृदयाच्या ठोक्यांमधील फरक दिसल्याने ही बाब तिला समजली!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT