नवी दिल्ली : ब्रेन स्ट्रोक हे भारतातील मृत्यूंचे तिसरे प्रमुख कारण आहे. तसेच विकलांगतेचेही ते सहावे मुख्य कारण ठरलेले आहे. स्ट्रोक पीडित तसेच शारीरिक दुखापतीने ग्रस्त लोकांवरील उपचारासाठी फिजियोथेरेपीसारखे काही मार्ग उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी काही दिवसांपासून ते महिन्यांपर्यंतचा काळ लागू शकतो. अशा वेळी रुग्ण व त्यांच्या मदतनिसांसाठी स्थिती बरीच आव्हानात्मक बनत असते. अशा रुग्णांना मदत करण्यासाठी आता भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) मधील संशोधकांनी हातात परिधान करता येण्यासारखे उपकरण बनवले आहे. एखाद्या हातमोज्यासारखे हे थ—ी-डी प्रिंटेड उपकरण रुग्णाच्या बोटांच्या हालचाली करण्यासाठी प्रकाशाच्या मूलभूत गुणांचा वापर करते.
हे थ—ी-डी प्रिंटेड उपकरण दूरवरूनही नियंत्रित केले जाऊ शकते. त्यामुळे फिजियोथेरेपिस्टशी टेलिकन्सल्टेशनची संभावनाही वाढते. 'आयआयएससी'मधील संशोधक अवीक बिड यांच्या टीमने हे उपकरण विकसित केले आहे. त्यांनी सांगितले की आम्ही असे उपकरण तयार करू इच्छित होतो जे स्वस्त असेल आणि गरजू व्यक्तीला त्याच्या सुविधेनुसार प्रत्येक वेळी उपलब्ध असेल. एखादा रुग्ण हातमोज्यासारखे ते परिधान करू शकतो आणि या उपकरणाला दूरवरूनही नियंत्रित करता येऊ शकते.
एखादा फिजियोथेरेपिस्ट इंटरनेटच्या माध्यमातून दूरवरून ते नियंत्रित करू शकेल व त्याप्रमाणे रुग्णाचे हात व बोटे हलू शकतील. डॉक्टर दूरवरूनही रुग्णावर देखरेख करू शकतील. हे उपकरण हाताच्या व बोटांच्या विविध हालचालींना टिपून घेऊ शकते आणि त्यांचा दाब, वाकण्याचा कोण तसेच आकार यासारख्या मापदंडांचे योग्य आकलन करू शकते. हे उपकरण प्रकाशाच्या अपवर्तन आणि परावर्तन या मूलभूत गुणांवर आधारित आहे. त्याचा रुग्ण आणि फिजियोथेरेपिस्ट अशा दोघांनाही भविष्यात चांगला उपयोग होऊ शकेल.