विश्वसंचार

स्क्वीड आणि माणसाचा मेंदू एकाच प्रकारे झाला विकसित

Arun Patil

वॉशिंग्टन : संशोधकांनी वाढत असलेल्या स्क्वीड भू्रणांच्या डोळ्यांमधील चेतापेशींचा अभ्यास केला व त्यावरून एक महत्त्वाचे रहस्य उलगडले गेले. 'सेफॅलोपॉड्स'चा मेंदू हा अगदी मानवी मेंदूप्रमाणेच विकसित झाला असल्याचे यामधून दिसून आले. विशेष म्हणजे या दोन्ही प्रजाती उत्क्रांतीच्या टप्प्यात 50 कोटी वर्षांपूर्वीच एकमेकांपासून वेगळ्या झालेल्या आहेत.

लाँगफिन स्क्वीडच्या (डोरिट्यूथिस पेलेई) भ्रूणांमधील रेटिनाचे हाय-रिझोल्यूशन कॅमेर्‍यांच्या साहाय्याने निरीक्षण करण्यात आले. त्यामधून असे दिसले की, जरी स्क्वीड आणि मानव यांच्यामधील संबंध 50 कोटी वर्षांपूर्वीच संपला असला तरी दोन्ही प्रजातींमधील मेंदूचा विकास एकाच पद्धतीने झालेला आहे. मेंदू किंवा मज्जासंस्था ही किती गुंतागुंतीची असावी याची मूळ 'ब्लूप्रिंट' ही अनेक प्रजातींमध्ये एकाच प्रकारची होती, हे यावरून दिसून येते.

'सेफॅलोपॉड्स' हे सागरी जलचरांचे एक मोठे कूळ आहे. या कुळामध्ये ऑक्टोपस, स्क्वीड आणि कटलफिश यांचा समावेश होतो. या कुळाकडे संशोधकांचे विशेष लक्ष असते. याचे कारण म्हणजे अन्य अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या तुलनेत या कुळातील प्राण्यांची स्मरणशक्ती तल्लख असते. ते आपल्या समस्या सोडवण्यासाठी साधनांचाही वापर करतात, कुतूहलापोटी प्रतिक्रिया देतात, त्यांनाही कंटाळा येतो तसेच ते खेळकरपणाही दर्शवतात. विशेष म्हणजे त्यांनाही स्वप्ने पडतात. त्यांच्याबाबतच्या नव्या संशोधनाची माहिती 'करंट बायोलॉजी' या नियतकालिकात देण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT