हनोई : बौद्ध धर्मात विशेषतः चीन, व्हिएतनामसारख्या देशांमध्ये ‘प्रेयर व्हील’ म्हणजेच प्रार्थना चक्राला विशेष महत्त्व आहे. हे एक धातूचे चक्रासारखे उपकरण असून, त्यावर पवित्र मंत्र कोरलेले असतात. अशी श्रद्धा आहे की, या चक्राला फिरवल्याने त्यामधील मंत्रांचा आशीर्वाद सक्रिय होतो, प्रार्थना ऐकली जाते. तसेच या मंत्रांचा जप केल्याचेही भाविकांना समाधान लाभत असते. जगातील सर्वात मोठे प्रार्थना चक्र व्हिएतनाममध्ये असून, ते 24 कॅरेट सोन्याने मढवलेले आहे.
हे दिव्य प्रार्थना चक्र व्हिएतनाममधील ‘सामतेन हिल्स’ या ठिकाणी उभारण्यात आले आहे. जगभरातून श्रद्धाळू येथे येतात आणि मन:पूर्वक प्रार्थना करतात. नुकतेच भारताचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू व्हिएतनाममध्ये पोहोचले आणि त्यांनी रात्रीच्या वेळी या प्रार्थना चक्राला स्वतः फिरवले. त्यांच्यासोबत भारताचे एक उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळही व्हिएतनाम दौर्यावर आहे.
रिजिजू यांनी या दैवी ठिकाणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रात्रीच्या वेळेस या समतेन हिल्सवरील प्रेयर व्हीलचा देखावा इतका भव्य आणि दिव्य दिसतो की, अनेकांना तो स्वर्गासारखा अनुभव वाटतो. या प्रार्थना चक्राचे वजन 200 टन असून, त्याची उंची 37.22 मीटर आहे. या चक्राचा व्यास 16.53 मीटर आहे. स्टील कोरसह काँक्रीटचा खांब यामध्ये आहे. हे चक्र तांब्याचे असून, त्यावर 24 कॅरेट सोन्याचा मुलामा आहे.