विश्वसंचार

सैबेरियात सापडला 3500 वर्षांपूर्वीच्या अस्वलाचा देह

Arun Patil

मॉस्को : रशियाचा अतिथंड भाग म्हणजे सैबेरिया. तेथील बर्फाच्या स्तरात (पर्माफ्रॉस्ट) अनेक वेळा हजारो वर्षांपूर्वीच्या प्राण्यांचे चांगल्याप्रकारे जतन झालेले मृतदेह सापडलेले आहेत. त्यामध्येच तब्बल 30 हजार वर्षांपूर्वीच्या सिंहाच्या एका छाव्याचाही समावेश आहे. आता तिथे एका तपकिरी अस्वलाचा मृतदेह सापडला आहे. सुमारे 3500 वर्षांपासून हे अस्वल गोठलेल्या बर्फात होते. हाडं गोठवणार्‍या बर्फाळ जंगलात या अस्वलाचे अवशेष पूर्णपणे संरक्षित होते. शास्त्रज्ञांच्या टीमने या अस्वलाच्या मृतदेहाची तपासणी करत हा एक अनोखा शोध असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी 2020 मध्ये बोल्शॉय ल्याखोव्स्की बेटावर पर्माफ्रॉस्टमध्ये रेनडिअर पाळणार्‍यांना एका मादी अस्वलाचे अवशेष सापडले होते.

पूर्व सैबेरियातील नॉर्थ-इस्टर्न फेडरल युनिव्हर्सिटीच्या लिव्हरेज मॅमथ संग्रहालयातील प्रयोगशाळेचे प्रमुख मॅक्सिम चेप्रसोवा म्हणाले की, तपकिरी रंगाच्या अस्वलाच्या संपूर्ण शवाचा हा अनोखा शोध आहे. हे अस्वल बोल्शॉल एथरिकॉन नदीच्या पूर्वेस आढळल्याने त्याला 'एथ्रिकन ब्राऊन बेअर' असे नाव देण्यात आले आहे. हे अस्वल 1.55 मीटर (5.09 फूट) उंच आणि सुमारे 78 किलो वजनाचे असल्याचे सांगितले जाते. अत्यंत थंड तापमानामुळे या अस्वलाचे मृत शरीर 3,460 वर्षे बर्फात सुरक्षित राहू शकले, असे सांगितले जात आहे.

यावर सायबेरियातील शास्त्रज्ञ चेप्रसोवा म्हणाले की, पहिल्यांदाच मऊ उती असलेला अस्वलाचा मृतदेह शास्त्रज्ञांच्या हाती आला आहे, ज्यामुळे शास्त्रज्ञांना अस्वलाच्या अंतर्गत अवयवांचा अभ्यास करण्याची आणि मेंदूची तपासणी करण्याची संधी मिळाली आहे. सायबेरियातील शास्त्रज्ञांनी अस्वलाची शरीराची बाहेरील कडक त्वचा कापली असून ते आता त्याच्या मेंदू, विषाणूजन्य आणि अनुवांशिक घटकांचा अभ्यास करीत आहेत. या अस्वलाचे वय अंदाजे 3 ते 4 वर्षे असू शकते. पाठीच्या मणक्याच्या हाडाला दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

शास्त्रज्ञांच्या टीमने जेव्हा या प्राचीन अस्वलाचे विश्लेषण केले, तेव्हा अस्वलाच्या शरीरातील गुलाबी ऊती आणि पिवळी चरबी स्पष्टपणे दिसत होती. यावर चेप्रसोवा म्हणाले की, अनुवांशिक विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, हे अस्वल रशियाच्या ईशान्य याकुतिया आणि चुकोटका येथील आधुनिक अस्वलांपेक्षा माइटोकॉन्ड्रियल डीएनएमध्ये वेगळे नाही. मात्र, हे अस्वल मुख्य भूमीपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेटावर कसे पोहोचले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे अस्वल बर्फ ओलांडून किंवा बेटावर पोहत गेला असावा असा अंदाज आहे. याशिवाय हे बेट त्यावेळी मुख्य भूभागाशी जोडले गेल्याने ते अस्वल त्याठिकाणी पोहोचले असेल असा असा अंदाज आहे.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT