काठमांडू : चीनने विज्ञानाच्या क्षेत्रातही मोठीच मजल मारलेली आहे. कृत्रिम सूर्य बनवण्यापासून ते अंतराळात स्वतःचे अंतराळस्थानक उभे करण्यापर्यंत तसेच चंद्राच्या आजपर्यंत कुणीही न गेलेल्या भागात आपले रोव्हर उतरवण्यापर्यंत अनेक बाबतीत चीनने आघाडी घेतली आहे. आता चीनने जगातील सर्वाधिक उंचीवरील हवामान केंद्र स्थापन करण्याचा विक्रमही केला आहे. माऊंट एव्हरेस्टवर समुद्रसपाटीपासून 8800 मीटर उंचीवर हे वेदर स्टेशन चीनने उभे केले आहे.
एव्हरेस्टची ओळख 'जगातील सर्वात उंच पर्वतशिखर' अशी आहे. हिमालयातील या उत्तुंग शिखरावर आता चीनने हे हवामान केंद्र स्थापित केले आहे. 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'नुसार हे जगातील सर्वाधिक उंचीवरील हवामान केंद्र आहे. या स्टेशनवरून होणार्या सूचनांचे आदान-प्रदान हे पूर्णपणे सॅटेलाईट सिस्टीमने केले जाईल. दर बारा मिनिटाला आपल्या संपूर्ण क्षेत्रातील हवामानाची माहिती हे केंद्र देत राहील. या शिखराच्या परिसरात होणार्या हिमवृष्टीचा अंदाजही या स्टेशनकडून घेतला जाईल. तसेच बर्फाच्या जाड स्तराचे मोजमाप करण्याचे कार्यही या स्टेशनकडून होईल. चीनने या प्रोजेक्टला 'समिट मिशन' असे नाव दिले आहे. या मोहिमेत रिसर्च टीमच्या पाच वैज्ञानिकांबरोबर सोळा वैज्ञानिकांचे आणखी एक पथक तसेच एकूण 270 पेक्षाही अधिक संशोधक सहभागी आहेत. समुद्रसपाटीपासून 8300 मीटर म्हणजेच 27,200 फूट उंचीवर या स्वयंचलित स्टेशनची संशोधकांनी चाचणी घेतली व ते योग्यप्रकारे काम करीत असल्याचे डेमोतून दाखवले. सौर ऊर्जेवर संचालित होणारे हे स्टेशन खराब हवमानातही दोन वर्षे कार्यरत राहू शकते. हे स्टेशन समुद्रसपाटीपासून तब्बल 8800 मीटर उंचीवर आहे. त्याने अमेरिका आणि बि—टिश वैज्ञानिकांनी स्थापित बाल्कनी स्टेशनचा विक्रम मोडला आहे. हे स्टेशन 2019 मध्ये एव्हरेस्टच्या दक्षिण बाजूवर 8430 मीटर उंचीवर स्थापन करण्यात आले होते.