विश्वसंचार

सर्वात महागड्या मशरुमला मिळणार ‘जीआय टॅग’

Arun Patil

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील हिमालयाच्या पायथ्याशी आढळणार्‍या एका मशरूमला 'सर्वात महागडे मशरूम' मानले जाते. त्याला उर्दू भाषेत 'गुच्छी' आणि चिनाबच्या खोर्‍यातील स्थानिक काश्मिरी लोकांच्या भाषेत 'काइच' म्हटले जाते. जंगलात आढळणार्‍या या मशरूमला येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये भौगोलिक ओळख (जीआय) टॅग मिळण्याची शक्यता आहे. अशा 'जीआयटॅग'मुळे एखाद्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात उत्पन्न होणार्‍या आणि विशेष अशा उत्पादनाला त्या क्षेत्राची ओळख मिळते.

गुच्छीची किंमत 30 हजार ते 50 हजार रुपये प्रतिकिलो इतकी असते. नैसर्गिकरीत्याच जंगलात उगवणार्‍या या मशरूमला 'सुपरफूड' मानले जाते. त्यामध्ये व्हिटॅमिन बी, सी, डी आणि के भरपूर प्रमाणात असते. तिची स्पंजी रचना, उत्कृष्ट स्वाद वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही एक जंगली आळिंबी असून ती अल्पाईन ट्री लाईन अर्थात वृक्ष रेखावर उगवते.

असे म्हटले जाते की गुच्छीच्या शेतीसाठी आतापर्यंत कोणतेही मानक वैज्ञानिक तंत्र विकसित झालेले नाही. ही आळिंबी अखनूरमध्ये चिनाब नदीच्या काठावरही मिळते. जम्मू-काश्मीरच्या राजौरी, पुंछ, डोडा, किश्तवाड, कुपवाडा आणि रामबन जिल्ह्यात ही आळिंबी आढळते. या मशरूमला 'जीआय' टॅग मिळाल्यावर अन्य देश किंवा क्षेत्रांकडून तिचा गैरवापर होऊ शकणार नाही. तसेच ही आळिंबी गोळा करणार्‍या व विकणार्‍या स्थानिक लोकांना फायदा होऊ शकेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT