विश्वसंचार

सर्वात महागडा टॉयलेट पेपर!

Arun Patil

सिडनी : हल्ली सोन्यासारख्या राजधातूचा वापर कशासाठी करतील हे काही सांगता येत नाही. सोन्याचे कमोड म्हणजे शौचकूपही बनवले गेले आहेत याची अनेकांना माहिती असेल. आता तर सोन्याचा वापर केलेले टॉयलेट पेपरही बनवण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातील 'टॉयलेट पेपर मॅन' नावाच्या कंपनीने हा असा टॉयलेट पेपर तयार केला आहे. कंपनीने 22 कॅरेट सोन्यापासून हा गोल्डन टॉयलेट पेपर बनवला आहे. या पेपरच्या एका रोलची किंमत एवढी आहे की तितक्या किमतीत भारतामध्ये एखादं छोटं हेलिकॉप्टर विकत घेता येईल. अर्थात कंपनीच्या वेबसाईवटील माहितीनुसार हा गोल्डन टॉयलेट पेपर आऊट ऑफ स्टॉक आहे. सर्व पेपर विकले गेले असून सध्या आमच्याकडे स्टॉक नाही असे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीने सोन्यापासून बनवलेला हा टॉयलेट पेपर रोल नेमका कोणाला विकता याबद्दलची माहिती दिलेली नाही. कंपनीने या टॉयलेट पेपर रोलची किंमत 10 कोटी 75 लाख 45 हजार 750 रुपये इतकी ठेवली होती. या पेपर रोलबरोबर शॅम्पेनची बाटली मोफत देण्यात आली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सोन्यापासून तयार करण्यात आलेला हा 'थ्री फ्लाय टॉयलेट पेपर' फारच मुलायम आहे. या कागदाचा वापर करताना त्यावरील सोन्याचे कण खाली पडतील आणि त्वचेला झालेला नाजूक स्पर्श अनुभवता येईल, असा या कागदाचा उल्लेख करताना कंपनीने म्हटले आहे.

दुबईमधील महागडी राजेशाही घरे आणि हॉटेलमधील गोल्डन टॉयलेट पाहून सोन्याचा टॉयलेट पेपर बनवण्याची कल्पना आल्याचे कंपनीने सांगितले. जर टॉयलेट सोन्याचे असेल तर टॉयलेट पेपरसुद्धा त्याच दर्जाचा हवा या संकल्पेनमधून हा पेपर बनवण्यात आला. टॉयलेट पेपर मॅन ही कंपनी टॉयलेट पेपरबरोबरच हँड सॅनिटायझर्स, क्लिनिंग प्रोडक्ट आणि हँड ग्लोव्हजसहीत इतर गोष्टींचीही निर्मिती करते.

हाँगकाँगमधील ज्वेलरी ब्रँड कोरोनेटने काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने बनवलेल्या गोल्डन टॉयलेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. हे गोल्डन टॉयलेट शंघायमध्ये 2019 साली चायना इंटरनॅशनल इम्पोर्ट एक्सपोमध्ये सर्वात आधी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या टॉयलेट सीटमध्ये 40 हजार 815 हिरे बसवण्यात आले होते. या सर्व हिर्‍यांचा विचार केल्यास ते एकूण 334.68 कॅरेटचे होते. कंपनीने टॉयलेटची किंमत 9 कोटी 22 लाख रुपये असल्याचे सांगितले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT