कोपेनहेगन ः जगात आधुनिक काळात अनेक प्रकारची कृत्रिम बेटं बनवण्यात आलेली आहेत. दुबईमधील पाम वृक्षाच्या आकाराची कृत्रिम बेटं व त्यावरील भव्य इमारती तर जगप्रसिद्ध आहेत. मात्र, एक बेट असे आहे जे मानवनिर्मित असले तरी पूर्णपणे निसर्गाच्या संवर्धनासाठीच समर्पित आहे. या बेटाचे नाव आहे पेबरहोम बेट. हे एक छोटेसे कृत्रिम बेट असून ते ओरेसुंड सामुद्रधुनीतील डेन्मार्कच्या बाजूस आहे. डेन्मार्क आणि स्विडनला जोडणार्या ओरेसुंड पुलासाठी या बेटाची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी समुद्रतळाशी असलेला गाळ व अन्य घटकांचा वापर करण्यात आला.
सॉल्टहोम नावाच्या छोट्या नैसर्गिक बेटापासून हे कृत्रिम बेट सुमारे एक किलोमीटर अंतरावर दक्षिणेस आहे. त्याचा विस्तार 1.3 चौरस किलोमीटरचा किंवा 320 एकरांचा आहे. हे बेट डेन्मार्कच्या मालकीचे आहे. पाण्याखालून जाणार्या टनेल किंवा बोगद्यासाठी तसेच तिथेपर्यंत जाणार्या पुलास आधार म्हणून हे बेट तयार करण्यात आले. या बेटाबाबत अतिशय कडक नियम व कायदे आहेत. बेटावर केवळ जीवशास्त्रज्ञांनाच वर्षातून एकदा संशोधनासाठी जाऊ देण्यात येते. बायोलॉजिकल सोसायटी ऑफ लुंडच्या संशोधकांनी या बेटावर वनस्पतींच्या 454 प्रजाती असल्याची नोंद केलेली आहे. तसेच कोळ्यांच्या वीस, पक्ष्यांच्या बारा प्रजातीही याठिकाणी आहेत. याठिकाणी दुर्मीळ असा हिरवा टोडही आढळतो.