सिडनी : समुद्रांची अथांग दुनिया अनेक रहस्यमय जीवांनी भरलेली आहे. अनेक वेळा असे जलचर किनार्यावरही वाहून येत असतात. त्यापैकी अनेक जीवांची प्रजाती विज्ञानाला अज्ञातही असते. आताही ऑस्ट्रेलियाच्या तटाजवळ असाच एक जीव वाहून आलेला आहे. या जीवाचे रंगरूप पाहता तो पृथ्वीवरीलच आहे की अन्य ग्रहावरील असा प्रश्न लोकांना पडला. या 'एलियन'सारख्या जीवाचे ओठ मानवी ओठांसारखे आहेत हे विशेष!
एका माणसाला समुद्रकिनारी फिरत असताना किनार्यावर हा जीव आढळून आला होता. त्याने या जीवाची छायाचित्रे टिपून घेतली आणि ती सोशल मीडियात व्हायरल झाली. ड्यू लॅम्बर्ट नावाच्या या माणसाने बोंडी बीचवर हा जलचर पाहिला त्यावेळी त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. अशा प्रकारचा जलचर त्याने यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. त्याने या जीवाचा व्हिडीओ बनवला, तसेच काही छायाचित्रेही टिपून घेतली.
मोठ्या ओठांच्या या जलचराची त्वचा एखाद्या शार्क माशासारखी होती. हा 'बोन शार्क' असू शकतो असे त्याला वाटले. अर्धा मीटर लांबीचा हा जलचर म्हणजे 'कॉफिन रे' असू शकतो अशीही शक्यता त्याने वर्तवली. सी लाईफ सिडनी अॅक्वॅरियमच्या एका सुपरवायझरनेही हा 'कॉफिन रे' होता असेच सांगितले. त्याला 'ऑस्टे्रलियन नम्बफिश' असेही म्हटले जाते. हा मासा मृत असल्याने फुगला होता व असा विचित्र दिसत होता.