विश्वसंचार

शंभर कोटी वर्षांमध्ये प्रथमच एक झाले दोन जीव

Arun Patil

वॉशिंग्टन : वैज्ञानिकांनी अब्जावधी वर्षांमध्ये एकदाच होणारी क्रमिक विकासाची एक घटना पाहिली आहे. दोन वेगवेगळ्या प्रजातींच्या जीवांचा एकमेकांमधील विलय प्रथमच रेकॉर्ड करण्यात आला. या दोन्ही जीवांनी मिळून एकच नवा जीव निर्माण केला. ही अत्यंत दुर्लभ घटना एका प्रयोगशाळेत घडली. एका विशिष्ट प्रकारचे सागरी शैवाल आणि एका जीवाणूचे हे मिलन होते. अब्जावधी वर्षांपूर्वी ज्यावेळी असे घडले, त्यावेळी पृथ्वीला वनस्पतींचा लाभ मिळाला होता. या संशोधनाची माहिती आता 'सेल' आणि 'सायन्स' या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

जीवनाच्या विकासाच्या या प्रक्रियेला 'प्रायमरी एंडोसिम्बायोसिस' असे म्हटले जाते. या प्रक्रियेत एक सूक्ष्म जीव दुसर्‍याला जणू काही गिळंकृत करतो. त्यानंतर त्याचा वापर आपल्याच शरीरातील अंतर्गत अवयवासारखा करू लागतो. त्याबदली या जीवाला यजमान शरीराकडून पोषक तत्त्वं, ऊर्जा, सुरक्षा आणि अन्य लाभ मिळतात. चार अब्ज वर्षांच्या काळात अशी प्रायमरी एंडोसिम्बायोसिसची प्रक्रिया दोन वेळेलाच झाली आहे. ज्या ज्यावेळी हे घडले, त्यावेळी क्रमिक विकासाला मिळालेली मोठी सफलता मानले गेले.

आता इतिहासात तिसर्‍यांदा ही घटना घडली आहे. यावेळी 'ब्रारूडोस्फेरा बिगेलोवी' नावाच्या शैवालाने 'यूसीवायएन-ए' नावाच्या सायनोबॅक्टेरियमला गिळंकृत केले आहे. या मिलनातून जे बनले, त्याला 'नायट्रोप्लास्ट' म्हटले जात आहे. जे काम शैवाल किंवा वनस्पती करू शकत नाहीत ते नायट्रोप्लास्ट करू शकेल, असे मानले जात आहे. वैज्ञानिकांना वाटते की, नायट्रोप्लास्ट थेट हवेतून नायट्रोजन घेऊन त्याला अन्य घटकांशी जोडून उपयुक्त घटक बनवतात. अमेरिकेतील सांताक्रुझच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील टायलर कोल यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

अब्जावधी वर्षांत दोनच घटना!

सर्वात प्रथम अशी घटना 2.2 अब्ज वर्षांपूर्वी घडली, ज्यावेळी एका आर्कियाने एका जीवाणूला गिळंकृत केले होते. जो मायटोकाँड्रिया बनला. ऊर्जा उत्पादन करणार्‍या या अवयवाने मूळ रूपाने जीवनाच्या सर्व जटिल रूपांना विकसित होण्याची चालना दिली. मायटोकाँड्रियाला आजही पेशींचे 'पॉवरहाऊस' म्हटले जाते. प्रायमरी एंडोसिम्बायोसिसची दुसरी घटना 1.6 अब्ज वर्षांपूर्वी घडली. त्यावेळी त्यामधील काही आणि अद्ययावत पेशींनी सायनोबॅक्टेरियाला शोषून घेतले होते. सायनोबॅक्टेरिया सूर्यप्रकाशातील ऊर्जा मिळवू शकते. या मिलनातून 'क्लोरोप्लास्ट' नावाचे ऑर्गेनेल बनले. या हरितद्रव्यामुळेच झाडे सूर्यप्रकाशातून ऊर्जा मिळवतात. झाडांच्या पानांचा रंगही त्यामुळेच हिरवा असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT