विश्वसंचार

व्होएजर यान 44 वर्षांनंतर आता निवृत्तीच्या वाटेवर

Shambhuraj Pachindre

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने 1977 मध्ये फ्लोरिडाच्या केप कॅनाव्हरल येथून दोन 'व्होएजर' यानांचे प्रक्षेपण केले होते. ही याने आता अंतराळात सर्वात दूर अंतरावर जाणार्‍या मानवनिर्मित वस्तू ठरलेल्या आहेत. 'व्होएजर-1' आणि 'व्होएजर-2' ही दोन याने गुरू आणि शनी या ग्रहांचे जवळून निरीक्षण करण्यासाठी पाठविण्यात आली होती. मात्र, ती अपेक्षेपेक्षा अधिक दूरवर निघून गेली आहेत. त्यांनी युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांचेही निरीक्षण केले. मात्र, आता 'व्होएजर'ची बॅटरी संपुष्टात येत आहे. त्यामुळे हे यान आता संपर्काच्या बाहेर जाणार आहे.

44 वर्षांनंतर आता 'नासा'ने यानाच्या एकेका यंत्रणेला बंद करणे सुरू केले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये ते पूर्णपणे बंद होईल. 'व्होएजर'ला ज्या मोहिमेसाठी पाठविण्यात आले होते, ते 1990 मध्येच पूर्ण झालेले आहे. मात्र, ही दोन्ही याने पृथ्वीवर डेटा पाठवत राहिली. 'व्होएजर-1' आणि 2 याने पृथ्वीपासून 14 अब्ज किलोमीटर दूर गेलेली आहेत. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे संशोधक राल्फ मॅकनट यांनी सांगितले की, 44.5 वर्षांपासून 'व्होएजर' काम करीत आहे.

आमची जितकी अपेक्षा होती, त्यापेक्षा 10 पट अधिक काम या यानाने केलेले आहे. 'व्होएजर'च्या निर्मितीमध्ये आपले योगदान दिलेल्या डोनाल्ड गर्नेट यांनी सांगितले की, आम्ही त्या काळात एकाच वेळी दोन याने नेहमीच लाँच करीत असे. एक बंद पडले तर दुसरे सुरू राहावे, असा त्यामागील उद्देश होता. त्या काळात यान असे बंद पडण्याची शक्यता अधिकच असे. संशोधक एलन कमिंग्स यांनी सांगितले की, 'व्होएजर-' 1 व 2 मध्ये 69.3 किलोबाईटची (केबी) मेमरी आहे. यापेक्षा जास्त मेमरी सध्या कारचा दरवाजा उघडणार्‍या किल्लीत असते! 'व्होएजर'ला रेडियोआइसोटोप थर्मोइलेक्ट्रिक जनरेटरपासून ऊर्जा मिळते. ही आण्विक ऊर्जा असून, तीच यानाला शक्ती देते. मात्र, आता सातत्याने हे आण्विक तत्त्व संपत चालले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT