विश्वसंचार

व्हाईट हाऊस मधील भुताटकीच्या आजही चर्चा!

Arun Patil

वॉशिंग्टन : भूताखेतांचे अस्तित्व विज्ञान मानत नसले तरी जगभरात सध्याच्या 21 व्या शतकातही भुताटकीचे किस्से रंगवून सांगितले जात असतात. अगदी युरोप-अमेरिकेसारख्या प्रगत ठिकाणीही भूताखेतांचे किस्से आजही कायम आहेत. जगातील सर्वात शक्‍तिशाली पद मानल्या जाणार्‍या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊस ही याला अपवाद नाही. या सुंदर निवासस्थानातही भूताटकी असल्याचे म्हटले जाते!

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान म्हटल्यावर तिथे किती काटेकोर सुरक्षा व्यवस्था असेल व त्यासाठी किती अद्ययावत तंत्रज्ञान असलेली यंत्रणा वापरली जात असेल, याची आपण कल्पना करू शकतो. अशा ठिकाणाबाबतही लोकांमध्ये भ्रम आहेत हे विशेष! हे ठिकाण केवळ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचेच नव्हे तर काही अद‍ृश्य शक्‍तींचेही निवासस्थान असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

काही लोकांनी दावा केला आहे की त्यांनी व्हाईट हाऊस च्या आसपास काही भयभीत करणार्‍या सावल्या वावरत असताना पाहिलेल्या आहेत. अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे भूत व्हाईट हाऊस मध्ये वावरते असा दावा तर गेल्या अनेक वर्षांपासून केला जातो. सन 1865 मध्ये त्यांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती.

त्यांच्या हत्येनंतर काही दिवसांनीच तेथील लोकांनी त्यांचे भूत वावरत असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. लिंकन यांच्या भूताबाबत एक किस्साही सांगितला जातो. एकदा नेदरलँडच्या महाराणी व्हिलमिना व्हाईट हाऊसमध्ये राहिल्या होत्या. रात्रीच्या वेळी कुणीतरी त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. त्यांनी दरवाजा उघडल्यावर त्यांना भास झाला की आपल्यासमोर अब्राहम लिंकन उभे आहेत!

व्हाईट हाऊसमध्ये 'वावरणारे' हेच एकमेव दिवंगत राष्ट्राध्यक्ष आहेत असे नाही. तिथे आणखीही एका दिवंगत राष्ट्राध्यक्षांचा वावर आहे! अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडम्स यांचेही भूत तिथे वावरते असे सांगितले जाते.

अर्थातच या कपोलकल्पित गोष्टी आहेत असे म्हटले जाते; पण या गोष्टी अद्यापही अस्तित्वात असून त्यांची माहिती तिथे राहणार्‍या अनेक राष्ट्राध्यक्षांनाही असते असे सांगितले जाते!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT