विश्वसंचार

लियोनार्ड : हिरव्या शेपटीच्या धूमकेतूचा व्हिडीओ टिपण्यात यश

अमृता चौगुले

वॉशिंग्टन ः सूर्याचे निरीक्षण करीत असलेल्या दोन सॅटेलाईटस् म्हणजेच कृत्रिम उपग्रहांनी चमकत्या हिरव्या रंगाची शेपूट असलेला धूमकेतू लियोनार्ड चा व्हिडीओ शूट केला आहे. हा धूमकेतू 70 हजार वर्षांच्या काळात प्रथमच पृथ्वीजवळून जात आहे. याच वर्षी जानेवारीमध्ये त्याचा शोध लावण्यात आला होता. तो ताशी 1,60,000 मैल वेगाने पृथ्वी आणि सूर्याकडे येत आहे. बर्फ आणि धुळीने भरलेल्या या धूमकेतूची रुंदी सुमारे एक किलोमीटर आहे.

'नासा'च्या सोलर टेरेस्ट्रियल रिलेशन्स ऑब्झर्व्हेटरी एस्पेसक्राफ्ट (स्टेरिओ-ए) आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या सोलर ऑर्बिटरी ऑब्झर्व्हेटरीने या लियोनार्ड धूमकेतूचा व्हिडीओ बनवला आहे. 'स्टेरिओ-ए' नोव्हेंबरपासून या हिरव्या धूमकेतूवर नजर ठेवून होता. त्याच्या अनेक छायाचित्रांचा वापर करून 'नासा'ने एक शॉर्ट अ‍ॅनिमेशन बनवली आहे. धूमकेतूपासून निघणारा प्रकाश दर्शवण्यासाठी वेगवेगळी छायाचित्रेही 'नासा'ने जारी केली आहेत. ज्यावेळी धूमकेतू वायू आणि पाण्याच्या बर्फासारखी बाष्पशील सामग्री बाहेर फेकू लागतो त्यावेळी त्याची चमक सातत्याने बदलू लागते. 17 ते 19 डिसेंबरदरम्यानच्या काळात धूमकेतूचा व्हिडीओ कॅप्चर करण्यात आला आहे. धूमकेतू लियोनार्ड 3 जानेवारी 2022 या दिवशी अनेक शतकांनंतर सूर्याच्या सर्वात जवळून पुढे जाईल. या घटनेपूर्वीच दोन्ही सॅटेलाईटस्ना त्याच्या दिशेत पाठवण्यात आले आहे. या बर्फाळ खडकाचा आंतरिक भाग सूर्याच्या जितक्या जवळ येतो तितकाच अधिक उष्ण होतो. त्यापूर्वी तो निळी धूळ, नंतर पिवळी आणि सफेद व शेवटी हिरव्या रंगाचे उत्सर्जन करतो. या धूमकेतूची शेपूट हिरवी आहे याचा अर्थ तो अतिशय उष्ण बनलेला आहे. यामध्ये अनेक सायनाईड आणि डायटोमिक कार्बन आहेत तसेच तो तुटण्याचीही शक्यता अधिक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT