लंडन : बारा वर्षांची मुलं अभ्यास आणि खेळ याकडेच लक्ष देत असतात. कधी कधी त्यांना आई-वडिलांकडून 'पॉकेटमनी'ही मिळते. मात्र, या वयातच एक मुलगा स्वकमाईने चक्क कोट्यधीश बनला आहे. या मुलाचे नाव बेन्यामिन अहमद असून तो बिटनमध्ये राहतो.
पाच वर्षांचा असल्यापासून हा मुलगा कोडिंग शिकत होता. आता याच कौशल्यामुळे तो कोट्यधीश बनला आहे.
त्याने छोट्याशा वयातच एक व्हेल थीमचे 'एनएफटी कलेक्शन' रिलीज केला होता. त्याचे हे कलेक्शन काही तासांमध्येच विकले गेले. त्यासाठी त्याला सुमारे 1 कोटी रुपये मिळाले. त्यानंतर त्याची अन्य व्हेंचरही यशस्वी झाले आणि काही महिन्यांमध्येच त्याने सुमारे 8 कोटी रुपयांची कमाई केली. आता या वयात त्याने 30 कोटींपेक्षाही अधिक कमाई केली आहे. बेन्यामिनने सांगितले की त्याचे शाळेतील मित्रही त्याच्या या कामाविषयी जाणून आहेत.
लोकांना आता माझ्याविषयी कुतुहल वाटत आहे. माझ्यामुळे अनेक जणांना 'एनएफटी'बाबत जाणून घेण्याची उत्सुकता वाटत आहे. बेन्यामिनचे वडील इमन यांनी सांगितले की त्याच्यासाठी हे व्हेंचर कधीही पैसे कमावण्याचे साधन नव्हते. तो केवळ स्वतःचे ज्ञान वाढविण्यासाठी हे करीत होता आणि पैसे हे बोनसच ठरले आहेत. आमच्या मुलांनी त्यांना ज्यामध्ये आनंद वाटेल अशी कामे करावीत हीच आमची इच्छा होती. बेन्यामिनचे सर्व पैसे 'इथेरियम' नावाच्या क्रिप्टो करन्सीमध्ये आहेत. अर्थात काही लोकांना वाटते की हे धोकादायक असून एक दिवस त्याचे हे सर्व पैसे बुडूही शकतात.