विश्वसंचार

लंडन : छोट्या हातांप्रमाणे टी-रेक्सचे डोळेही होते बारीक!

अविनाश सुतार

लंडन ः 'ज्युरासिक पार्क'सारख्या चित्रपटांमधून आपण बहुतेक वेळा टी-रेक्स म्हणजेच टायरॅनोसॉरस रेक्स प्रजातीचे डायनासोर पाहिलेले असतात. हे मांसाहारी व आक्रमक शिकारी असलेले डायनासोरच नेहमी आपल्या डोळ्यांसमोर उभे असतात. हे डायनासोर मागील मोठ्या पायांवर चालत किंवा धावत असत. त्यांचे पुढील दोन पाय किंवा हात हे छोटे होते. त्यांचा जबडा अतिशय बळकट व धारदार दातांनी भरलेला होता. एखाद्या भक्ष्याच्या हाडांचाही चक्काचूर करण्यासारखा हा जबडा होता. त्याला आपल्या भक्ष्याचा लचका तोडण्याइतकी ताकत मिळण्यासाठी निसर्गाने त्याच्या चेहर्‍यातही काही अनुकूल बदल केलेले होते असे संशोधकांना आढळले आहे. या डायनासोरचे डोळेही त्यानुसार मोठे नसून छोट्या आकाराचेच होते.

त्याचे हे लहान डोळे त्याच्या विकासाच्या टप्प्यातील किंवा उत्क्रांतीमधील अनुकूल बदल होय. 252 दशलक्ष ते 66 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या काळाला 'मेसोझोईक काळ' असे म्हटले जाते. या काळातील टी-रेक्सच्या 410 जीवाश्मांचा अभ्यास करण्यात आला. त्यामधून असे दिसून आले की टी-रेक्स व अन्यही काही मांसाहारी डायनासोरचे डोळे काळाच्या ओघात लहान आकाराचे होत गेले. त्यांचा जबडा अधिकाधिक ताणावा व मोठा घास घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी हा बदल घडत गेला. विशेषतः ज्या मांसाहारी डायनासोरच्या कवट्यांची लांबी 3.2 फूट म्हणजेच 1 मीटर होती त्यांच्यामध्ये डोळ्यांच्या खोबणीवरून असे बदल दिसून येतात. मोठ्या आकाराच्या भक्ष्याला जबड्यात सहजपणे पकडता यावे अशी त्यांच्या जबड्याची रचना बनत गेली व पर्यायाने डोळ्यांचा आकारही लहान होत गेला. स्कॉटलंडच्या नॅशनल म्युझियममधील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले असून त्याबाबतची माहिती 'कम्युनिकेशन्स बायोलॉजी' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT