विश्वसंचार

रोबोने मळली कणीक!

Arun Patil

वॉशिंग्टन : सध्या हरेक नमुन्याचे रोबो तयार होत आहेत. सीमेवर संरक्षण करणार्‍या रोबोपासून ते हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करणार्‍या रोबोपर्यंत, हॉटेलमध्ये वेटरचे काम करणार्‍या रोबोपासून ते कारखान्यात काम करणार्‍या रोबोपर्यंत अनेक रोबो पाहायला मिळतात. घरगुती कामे करू शकणारे रोबोही बनलेले आहेत व अमेरिका, जपानसारख्या देशात त्यांचा वापरही सुरू आहे. आता अशाच एका रोबोचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा रोबो चक्क कणीक मळत असताना दिसतो!

सध्या 'एआय' म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे रोबोंचे काम अधिक सोपे झाले आहे. 'एआय'च्या मदतीने अनेक कामे चुटकीसरशी केली जात आहेत. एका रेस्टॉरंटमध्ये असाच 'एआय' आधारित रोबो कणीक मळताना दिसून येतो. तो इतक्या सहजपणे कणीक मळत आहे की पाहणारे थक्क होतात. अर्थातच हा रोबो 'एआय' म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सूचनेनुसार सर्व कामे करीत आहे.

त्याने अतिशय कमी वेळात कणकेचा मोठा गोळा तयार केला. हा व्हिडीओ रेस्टॉरंटमधीलच एका कर्मचार्‍याने बनवला व तो आता व्हायरल झाला आहे. त्यावर अनेक यूजर्स आपापल्या प्रतिक्रियाही देत आहेत. असे रोबो लोकांच्या नोकर्‍याही हिरावून घेऊ शकतात अशीही अर्थातच प्रतिक्रिया आलेली आहे!

SCROLL FOR NEXT