जयपूर : रोबोटच्या विषयावर आपल्याकडे अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. त्यामध्ये रजनीकांतच्या 'रोबोट' या चित्रपटापासून अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'तेरी बातो में ऐसा उलझा जिया'पर्यंतच्या अनेक चित्रपटांचा समावेश होतो. यामध्ये रोबोटविषयी प्रेमासारख्या मानवी भावनाही जोडल्या जातात हे दर्शवले आहे. आता असाच प्रकार राजस्थानमध्ये पाहायला मिळत आहे. राजस्थानमधील एक व्यक्ती चक्क रोबोटसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची अजब गजब माहिती उघडकीस आली आहे. राजस्थानमध्ये जयपूर येथे राहणारे इंजिनिअर सूर्य प्रकाश समोटा हे एका रोबोटशी लग्न करणार आहेत. रोबोटस्ची आवड असलेल्या सूर्य प्रकाश आता रोबोटच्या प्रेमातच पडले असून, ते आता 'गीगा' या नावाच्या रोबोटसोबत लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.
सूर्य प्रकाश यांचे मन रोबोटमध्ये गुंतले होते. कुटुंबाने त्याची रोबोटस्ची आवड पाहून आयटी क्षेत्रात जाण्याची परवानगी दिली. यानंतर सूर्य प्रकाश यांनी अजमेरच्या शासकीय महाविद्यालयातून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते रोबोटिक्समध्ये रुजू झाले. या काळात त्यांनी अनेक प्रकल्पांवर काम केले, तर आता ते एका रोबोटसोबत सर्व विधी, परंपरेनुसार लग्न करणार आहे. तसेच कुटुंबातील सदस्यही त्यात सहभागी होणार आहेत, असे सूर्य प्रकाश यांनी सांगितले.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, 'गीगा' हा रोबोट तयार करण्यासाठी सुमारे 19 लाख रुपये खर्च आला. अशा प्रकारचे लग्न करण्यास कुटुंबीयांचा नकार होता, पण आता त्यांना मी तयार केले आहे. या रोबोटची निर्मिती तामिळनाडूमध्ये केली जात आहे, तर त्याचे प्रोग्रामिंग दिल्लीत केले जात आहे. 'लहानपणापासून मला रोबोटस्मध्ये खूप रस होता. मात्र, मी सैन्यात भरती व्हावे असे माझ्या कुटुंबीयांना वाटत होते. त्यानंतर मी सैन्यात भरती होण्याची तयारी केली आणि नौदलातही निवड झाली,'असे सूर्य प्रकाश यांनी सांगितले. सूर्य प्रकाश यांनी सांगितले की, 'जेव्हा हा सर्व प्रकार मी आपल्या पालकांना सांगितला तेव्हा त्यांना धक्काच बसला, पण नंतर घरच्यांना समजावले.
'गीगा'च्या संपूर्ण प्रोग्रामिंगसाठी सुमारे 5 लाख रुपये खर्च येणार असून, हा प्रोग्रामिंग इंग्रजीमध्ये असणार आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा हिंदी प्रोग्रामिंग देखील जोडले जाऊ शकते. तसेच, 'गीगा' आठ तास काम करू शकते, ज्यामध्ये पाणी आणणे, हॅलो म्हणणे, पाहुण्यांचे स्वागत करणे यासारखी कामं तो रोबोट करणार आहे.' दरम्यान, सूर्य प्रकाश यांनी सुमारे चारशे रोबोटिक्स प्रकल्पांवर काम केले आहे. कोरोनाच्या काळात जयपूरच्या सवाई मानसिंह रुग्णालयात रोबोटच्या माध्यमातून रुग्णांना औषधे आणि अन्न दिले जात होते. याशिवाय त्यांनी कोरोनाच्या काळात टचलेस मतदान यंत्राचं मॉडेलही तयार केले होते. आता सूर्य प्रकाश हे इस्रायली सैन्यासोबत काम करणार आहेत आणि लवकरच ते इस्रायलला रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.