विश्वसंचार

रक्ताच्या एका थेंबाने उलगडले तीस वर्षांपूर्वीच्या खुनाचे रहस्य!

Arun Patil

वॉशिंग्टन : सर ऑर्थर कॉनन डॉयल यांच्या शरलॉक होम्सपासून ते बाबुराव अर्नाळकरांच्या मर्‍हाटमोळ्या धनंजयपर्यंत अनेक नायकांच्या कथा वाचत एक पिढी मोठी झाली. अनेक रहस्यकथांमध्ये, हेरकथांमध्ये जुनी 'मर्डर मिस्ट्री' कशी उलगडली याचे वर्णन केले जात असते. अगदी चित्रपटांमध्येही आपण हत्येची जुनी प्रकरणं आणि अनेक वर्षांनी त्याचा खुलासा होताना पाहिलं असेल. असेच एक 'रिअल लाईफ' प्रकरण समोर आले आहे.

यामध्ये पोलिसांनी तीन दशकांपूर्वी झालेल्या डबल मर्डरची मिस्ट्री सोडवली आहे. विशेष म्हणजे रक्ताच्या एका थेंबाच्या मदतीने पोलिसांना या दुहेरी हत्याकांडाचा खुलासा करण्यात यश आले. अमेरिकेतील व्हरमाँट राज्यातील पोलिसांनी रक्ताच्या एका थेंबाच्या मदतीने तीन दशकं जुन्या हत्येच्या घटनेचं गूढ उकललं.

व्हरमाँट स्टेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 76 वर्षीय जॉर्ज पिकॉक आणि 73 वर्षीय कॅथरिन पिकॉक हे दाम्पत्य सप्टेंबर 1989 मध्ये डॅनबी येथील त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळलं होतं. दाम्पत्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले होते; पण घरात कोणीही जबरदस्तीने घुसल्याचा पुरावा मिळाला नव्हता. या प्रकरणात पोलिस पुरावे शोधत राहिले, परंतु गुन्हेगारापर्यंत पोहोचता येईल, असा कोणताच पुरावा त्यांना मिळाला नाही.

मात्र, तब्बल 30 वर्षांनंतर पोलिसांना एक असा पुरावा मिळाला, ज्याच्या मदतीने गुन्हेगारांची तुरुंगात रवानगी झाली. व्हरमाँट स्टेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 79 वर्षीय अँथनी लुईसला गुरुवारी (13 ऑक्टोबर रोजी) या हत्येप्रकरणी अटक केली. लुईसला व्हरमाँटमध्ये प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेसाठी न्यूयॉर्कमध्ये तुरुंगात टाकण्यात आले आहे. या जोडप्याच्या हत्येच्या वेळी लुईसचं लग्न जोडप्याच्या मुलीशी झालं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याच्या हत्येनंतर दोनच आठवड्यांनंतर लुईसच्या सासरच्या लोकांनी त्याच्यावर संशय असल्याचे पोलिसांना सांगितलं होतं. त्यानंतर त्यावेळी या प्रकरणाचा तपास करणार्‍या पोलिसांनी लुईसच्या विरोधात बरेच पुरावे शोधले; पण त्या तोच खुनी असल्याचं सिद्ध करण्यात यश आलं नाही. कालांतराने काहीच माहिती मिळत नसल्याने तपासाची फाईल बंद झाली; पण अचानक एका नवीन अधिकार्‍याला या प्रकरणात रस निर्माण झाला आणि तो ही मर्डर मिस्ट्री सोडवण्याच्या कामाला लागला. अशातच मे 2020 मध्ये फॉरेन्सिक टीमने एका अहवालातून धक्कादायक खुलासा केला.

टीमने सांगितलं, की ऑक्टोबर 1989 मध्ये लुईसच्या कारमध्ये सापडलेला रक्ताच्या एका थेंबाचा डाग होता, तो जॉर्ज पिकॉकचा होता. दोघांचे डीएनए मॅच झाले होते. खरं तर हत्येच्या 1 महिन्यानंतर पोलिसांना जॉर्जच्या गाडीतून रक्ताचा 1 थेंब सापडला होता; पण कोणीही त्यावर गांभीर्याने विचार केला नाही आणि तो पुरावा म्हणून गोळा करूनही लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवला नाही. नंतर नवीन तपास अधिकार्‍याने तो थेंब टेस्टिंगसाठी पाठवला आणि जावईच या दाम्पत्याच्या हत्येचा आरोपी होता हे तीन दशकांनी उघड झालं. सध्या लुईस तुरुंगात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT