विश्वसंचार

मॉडर्ना घेणार ‘एचआयव्ही’ लसीच्या मानवावरील चाचण्या

Arun Patil

वॉशिंग्टन : सध्या जगभर कोरोना महामारी सुरू आहे आणि त्यावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर विविध संशोधनेही सुरू आहेत. कोरोना प्रतिबंधक लस तयार झाल्या असून जगभर वेगाने लसीकरणही सुरू आहे.

या संशोधनातून अन्यही काही आजारांवरील उपचाराची दिशा मिळत आहे हे विशेष. अगदी कर्करोगासारख्या गंभीर आजारावरील उपचारासाठीही या संशोधनची मदत होईल हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.

आता कोरोना लस संशोधनातून 'एचआयव्ही' व 'एड्स'वरही रामबाण उपाय सापडेल असा संशोधकांना विश्वास वाटत आहे. 'मॉडर्ना' कंपनीकडून अशी 'एम-आरएनए' प्रायोगिक लस विकसित करण्यात आली असून अमेरिकेत तिच्या मानवी चाचण्या घेण्यात येणार आहेत.

'एचआयव्ही' या विषाणूच्या संक्रमणामुळे 'एड्स' हा आजार होतो. त्यावरही सध्या कोणताही रामबाण उपाय नाही. 'एचआयव्ही'चे संकट जगावर आल्यापासून तब्बल 40 वर्षांनी यावर उपाय सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जगातील कोरोनाची पहिली लस आणणारी अमेरिकेतील फार्मास्युटिकल आणि बायोटेक कंपनी 'मॉडर्ना' एचआयव्ही लसींसाठी मानवी चाचण्या घेणार आहे.

या लसीदेखील कोरोना लसीप्रमाणेच 'एम-आरएनए' तंत्रावर आधारित असतील. 'मॉडर्ना' त्यांच्या 'एचआयव्ही' लसींच्या दोन व्हर्जनच्या चाचण्या घेणार आहे. ही 'एचआयव्ही'वरील 'एम-आरएनए'ची पहिली लस आहे, ज्याची मानवांवर चाचणी घेतली जाणार आहे.

यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (एनआयएच) क्लिनिकल ट्रायल्स रजिस्ट्रीनुसार, 18 ते 50 वयोगटातील 56 एचआयव्ही-निगेटिव्ह लोकांना पहिल्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये सहभागी केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये चार गट असतील.

यामधील दोन गटांना लसीचा मिश्र डोस दिला जाईल, तर इतर दोन गटांना दोनपैकी एक लस दिली जाईल. या चाचणीत सहभागी होणार्‍या लोकांना ते कोणत्या गटात आहेत, याची माहिती दिली जाईल. या चाचण्या मे 2023 पर्यंत चालण्याची शक्यता असून पहिल्या टप्प्याचा कालावधी दहा महिन्यांचा असेल.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, एड्समुळे आतापर्यंत जगभरातील 3 कोटी 60 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 2020 च्या अखेरपर्यंत जगभरात 3 कोटी 70 लाखांपेक्षा अधिक लोक एचआयव्ही संसर्गासह जगत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT