वॉशिंग्टन : एका नव्याने समोर आलेल्या व्हिडीओमध्ये, खोल समुद्रातील ‘रॅटटेल’ मासळीच्या डोक्यावर दोन रक्तशोषक परजीवी घट्टपणे चिटकलेले दिसतात. हे विचित्र द़ृश्य श्मिट ओशन इन्स्टिट्यूटने फेसबुकवर शेअर केले आहे. दोन्ही बाजूंना कोपेपॉड्स नावाचे लहान क्रस्टेशियन्स आहेत आणि त्यांच्या पाठीवरून लांब अंड्यांच्या पिशव्या झुलत असल्यामुळे मासळीच्या डोक्यावर डुकराच्या शेपटीसारखा देखावा तयार झाल्यासारखा वाटतो.
‘हे परजीवी त्यांच्या कुरतडणार्या तोंडाच्या भागांनी मासळीच्या स्नायूंमध्ये खोलवर जाऊन तिच्या रक्त व द्रव पदार्थांवर उपजीविका करतात,’ असे स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरीमधील उत्क्रांतीशास्त्रज्ञ जेम्स बर्नोट यांनी सांगितले. ही द़ृश्ये दक्षिण अटलांटिकमधील साऊथ सँडविच आयलंड्स जवळील खोल समुद्रतळाच्या आणि जैवविविधतेच्या अभ्यास मोहिमेदरम्यान 1604 फूट (489 मीटर) खोलवर टिपण्यात आली.
या दोन परजीवी कोपेपॉड्सना Lophoura szidat असे म्हणतात. ते Macrourus या वंशातील रॅटटेल मासळीच्या डोक्यावर चिटकलेले आहेत. या माशांना मोठ्या डोक्यामुळे आणि लांब शेपटीमुळे ‘ग्रेनेडिअर्स’ किंवा ‘रॅटटेल्स’ म्हणूनही ओळखले जाते. हे मासे उत्तर व दक्षिण अटलांटिक तसेच अंटार्क्टिक भागातील थंड समुद्रांमध्ये आढळतात आणि 1,312 ते 10,450 फूट (400 ते 3,185 मीटर) खोल समुद्रात राहतात. L.szidati हे Sphyriidae कुटुंबातील असून, मादी कोपेपॉड्स मासळीच्या शरीरात खोलवर तोंड घालून तिच्या स्नायूंचा भाग खातात.
या परजीवींना ‘मेसोपरासाइट्स’ म्हणतात, म्हणजे ते अर्धवट शरीरात आत आणि अर्धवट शरीराबाहेर असतात. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते की, त्यांच्या शरीराचा मागचा भाग मासळीच्या बाहेर आहे, तर पुढचा भाग आत दडलेला आहे. हे परजीवी आपल्या जीवनाच्या लार्वा अवस्थेतच यजमान शोधतात. ते यजमानाच्या त्वचेत घुसतात आणि तेथे रक्त शोषून स्वतःचे रूपांतर करतात.
या प्रक्रियेत ते त्यांच्या शरीरावर अँकरसारखे ‘होल्डफास्ट्स’ विकसित करतात, जे त्यांना यजमानाशी घट्ट जोडून ठेवतात. अशा प्रकारचे रक्तशोषण आणि परजीवित्वाचे प्रकार खोल समुद्रात किती प्रमाणात असतात, यावर अजून खूपच कमी माहिती उपलब्ध आहे; मात्र L. szidati hm Macrourus माशांवर आढळणार्या सर्वात सामान्य परजीवींमध्ये गणला जातो, विशेषतः अंटार्क्टिक पाण्यात.