लंडन : लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात 'गोंडवाना' नावाचा एक महाखंड होता. सुमारे 35 कोटी वर्षांपूर्वी ज्यावेळी डायनासोरचे युग सुरू झालेले नव्हते त्या काळात एक महाकाय आणि घातक मासा या गोंडवानातील नद्यांमध्ये वावरत होता. माणसाच्या तत्कालीन पूर्वजांवरही हल्ले करून त्यांना खाणार्या या माशाचे आता जीवाश्म सापडले आहे. दक्षिण आफ्रिकेतील वॉटर्लु फार्म साईटवरील उत्खननात या माशाचे जीवाश्म सापडले.
हा मासा 9 फूट लांबीचा होता. 383 दशलक्ष ते 359 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या काळातील हा सर्वात मोठा मासा होता. स्विडनच्या उप्पसाला युनिव्हर्सिटीतील पर अहलबर्ग यांनी सांगितले की हा मासा सध्याच्या मगरीसारखा होता. त्याच्या जबड्यात अनेक छोटे व अणुकुचीदार दात होते. त्यामध्येच सापाच्या विषदंतासारखे मोठे सुळेही होते. ते दोन इंच लांबीचेही असत. 1995 मध्येच अशा माशाचे पहिले संकेत संशोधकांना मिळाले होते. त्यावेळी वॉटर्लु फार्ममधील उत्खननात अशा माशाचे काही अवशेष सापडले होते.
आता त्यांच्या जीवाश्मातील वेगवेगळे भाग एकत्र करून त्यांच्या हाडांचा सांगाडा कसा होता याची एक रचना बनवण्यात आली आहे. माशाच्या या प्रजातीला 'हायनेरीया उडलेझिनी' असे नाव देण्यात आले आहे. त्याच्या त्वचेवर तरसाच्या पाठीवर जसे पट्टे असतात तशा रचना होत्या. हे मासे आक्रमक शिकारी होते.