विश्वसंचार

‘भूलभुलैया’सारखी रचना असणारा चार हजार वर्षांपूर्वीचा राजवाडा

Arun Patil

अथेन्स : पुरातत्त्व संशोधकांनी ग्रीसच्या क्रेट बेटावर चार हजार वर्षांपूर्वीच्या राजवाडासद़ृश्य वास्तूचे अवशेष शोधले आहेत. विशेष म्हणजे या महालाच्या भिंती एखाद्या भूलभुलैयासारख्या गोलाकार आहेत. काही विशिष्ट विधी करण्यासाठी हा महाल बांधण्यात आला असावा, असेही संशोधकांना वाटते. कास्टेलीमधील एका टेकडीच्या माथ्यावर या 'पॅलेस'चे अवशेष शोधण्यात आले आहेत.

या वास्तूमध्ये आठ दगडी वर्तुळे असून, त्यामध्ये खोल्या तयार करण्यासाठी मधूनमधून लहान भिंती बांधलेल्या आढळतात. ही अनोखी वास्तू क्रेट बेटावरील किंग मिनोस या राजाने बांधली असावी, असे संशोधकांना वाटते. या रचनेचा व्यास 157 फुटांचा आहे. क्रेटची राजधानी हेराक्लिओनपासून 51 किलोमीटर अंतरावर या राजवाड्याचे अवशेष सापडले आहेत. काही कामगार एका नव्या विमानतळासाठी तिथे सर्व्हिलन्स रडार सिस्टीम उभी करीत असताना अपघातानेच या रचनेचा शोध लागला.

या वास्तूचे दोन प्रमुख भाग होते, असे दिसून येते. त्यामध्ये मध्यभागी असलेल्या 49 फूट व्यासाची गोलाकार इमारत आणि त्यापासून त्रिज्येच्या स्वरूपात बांधलेल्या भिंतींचा परिसर यांचा समावेश होतो. यावेळी करण्यात आलेल्या उत्खननावेळी काही मातीची भांडीही सापडली. त्यांच्या अभ्यासावरून ही इमारत इसवी सन पूर्व 2000 ते इसवी सन पूर्व 1700 या काळातील असावी, असा अंदाज बांधला आहे. युरोपमधील सर्वात गुंतागुंतीची इमारत क्रेटवरील या लोकांनी बांधली होती, असे आता दिसून आले आहे.

SCROLL FOR NEXT