विश्वसंचार

भारतीय जीवनशैलीला अनुकूल कृत्रिम पाय विकसित

दिनेश चोरगे

गुवाहाटी :   आयआयटी गुवाहाटीच्या संशोधकांनी भारतीय जीवनशैलीला अनुकूल असे कृत्रिम पाय विकसित केले आहेत. दिव्यांग लोकांचे जीवन सुकर बनवण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्यामध्ये आयआयटी गुवाहाटीने आपले हे महत्त्वाचे योगदान दिले आहे. मांडी घालून बसणे, उकिडवे बसणे अशा भारतीयांच्या सवयींना अनुसरून हे पाय विकसित केले आहेत. त्यामुळे असा कृत्रिम पाय बसवलेल्या माणसाला भारतीय पद्धतीप्रमाणे बसण्यात अडचण येत नाही.

उंच-सखल रस्त्यावरून चालताना हे कृत्रिम पाय दिव्यांग लोकांना सहायक ठरतील. वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना ते वापरता येतील. आयआयटी गुवाहाटीमधील प्रा. एस. कनगराज यांनी म्हटले आहे की, आमच्या टीमने विकसित केलेल्या या पायाच्या गुडघ्यामधील सांध्यात एक स्प्रिंग असिस्टेड डीप स्क्‍वॅट मेकॅनिजम आहे. त्यामुळे भारतीय पद्धतीने बसणे किंवा भारतीय पद्धतीच्या शौचालयाचा वापर करणे अशा क्रियांमध्ये ते उपयुक्‍त ठरते.

या कृत्रिम पायाचा गुडघा चांगल्या प्रकारे वळवता येऊ शकतो. त्यामधील लॉकिंग तंत्रामुळे अज्ञात परिसरातील रस्त्यांवर चालत असताना पडण्याचा धोका कमी होतो. गुडघ्यातील समायोजन लिंकची लांबी दिव्यांग व्यक्‍तीचे वय आणि गरजा यांच्या आधारावर अधिक स्थिरता व सहज फ्लेक्सिंगसाठी मदत करते. एकूणच गुडघ्याचे जोड हे भारतीय जीवनशैलीला अनुकूल अशा पद्धतीने डिझाईन केलेले आहेत.

सध्या शरीराच्या शंभर किलो वजनापर्यंत आंतरराष्ट्रीय लोडिंग स्थितीनुसार या कृत्रिम पायाचे परीक्षण सुरू आहे. या पायासाठी पॉलिमर, अ‍ॅल्युमिनियम मिश्र धातू व स्टेनलेस स्टीलचा वापर केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT