विश्वसंचार

ब्रेन डेड रुग्णांमध्ये तीन दिवस धडकले डुकराचे हृदय

Arun Patil

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतील डॉक्टरांनी अवयव प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात एक महत्त्वाचे यश मिळवले आहे. त्यांनी दोन ब्रेन डेड रुग्णांच्या शरीरात डुकराच्या हृदयांचे यशस्वी प्रत्यारोपण केले. हे हृदय तीन दिवस या लोकांच्या शरीरात धडकत राहिले आणि हा प्रयोग यशस्वी झाला.

मानवी शरीरात अन्य प्राण्याच्या अवयवाचे प्रत्यारोपण करणे हे वैद्यकीय विज्ञानाच्या क्षेत्रात एक मोठे लक्ष्य गाठण्यासारखेच आहे. संशोधकांनी एक पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. जून आणि जुलैमध्ये तीन दिवसांचा हा प्रयोग करण्यात आला. या दोन्ही रुग्णांच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आलेली डुकराची हृदये तीन दिवसांपर्यंत योग्य प्रकारे आपले काम करीत राहिली. या रुग्णांना व्हेंटिलेटरचा वापर करून जिवंत ठेवण्यात आले होते. याच वर्षी जानेवारीत एका रुग्णाच्या शरीरात डुकराचे हृदय प्रत्यारोपित करण्यात आले होते व त्याचा मार्चमध्ये मृत्यू झाला होता. आता हा नवा प्रयोगही यशस्वी ठरल्याने याबाबतच्या संशोधनाचे नवे दालन खुले झाले आहे.

संशोधकांनी आधी एका विशेष उपकरणाच्या सहाय्याने डुकरांच्या हृदयात आढळणार्‍या विषाणूची तपासणी केली. त्यानंतर जूनमध्ये एका रुग्णामध्ये डुकराचे हृदय प्रत्यारोपित करण्यात आले. अशाच प्रकारे दुसर्‍या एका ब्रेन डेड रुग्णामध्ये 6 जुलैला डुकराचे हृदय प्रत्यारोपित केले. दोन्ही रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले व त्यांचे 72 तास निरीक्षण केले गेले. दोन्ही रुग्णांमध्ये प्रत्यारोपित केलेली हृदये तीन दिवस चांगल्याप्रकारे काम करीत होती असे दिसून आले.

युनिव्हर्सिटीचे संशोधन संचालक डॉ. मोआजामी यांनी सांगितले की एखाद्या मानवाच्या शरीरात डुकराचे हृदय धडकत असताना पाहणे हा चकीत करणारा अनुभव आहे. जगभरातील लाखो लोकांना रोजच प्रत्यारोपणासाठी अवयवांची प्रतीक्षा असते. मात्र, दात्यांची संख्या मोजकीच असल्याने अवयव कमी उपलब्ध होता. अशा वेळी डुकराच्या शरीरातील अवयव चांगला पर्याय ठरू शकतील.

SCROLL FOR NEXT