लंडन : कॅनडामध्ये अल्बर्टा येथे संशोधकांच्या एका पथकाने डक बिल्ड डायनासोरचे जीवाश्म शोधले आहे. या जीवाश्माची खासियत म्हणजे या डायनासोरची बास्केटबॉलसारखी त्वचा यामधून स्पष्ट दिसून येते. त्याचा जवळजवळ संपूर्ण अवस्थेतील सांगाडा या जीवाश्मात आहे. त्वचेवरील ठोकळ्यांसारखे रचना कोट्यवधी वर्षांनंतरही अजून दिसून येते हे विशेष. अशा शोध 'वन्स इन अ लाईफटाईम' असा दुर्मीळ असतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.
इंग्लंडमधील रीडिंग युनिव्हर्सिटीतील इकॉलॉजीचे प्राध्यापक ब्रायन पिकल्स यांनी सांगितले की यापूर्वी असे कधीही पाहायला मिळाले नव्हते. ज्यावेळी आम्ही हे जीवाश्म पाहिले त्यावेळी थक्कच झालो! हा डायनासोर सुमारे 7 कोटी 60 लाख वर्षांपूर्वी भूतलावर वावरत होता. त्याचे हे 13 फूट लांबीचे जीवाश्म आता आढळले आहे. 145 ते 66 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या क्रेटाशियस काळातील हा डायनासोर आहे.
हे जीवाश्म ज्याठिकाणी आढळले त्या ठिकाणाला सध्या 'डायनासोर प्राव्हिन्शियल पार्क' असे म्हटले जाते व युनेस्कोने हे ठिकाण जागतिक वारशांच्या यादीत समाविष्ट केले आहे. याचे कारण म्हणजे याठिकाणी 400 ते 500 डायनासोर सांगाडे किंवा कवट्या सापडलेल्या आहेत. आता ज्या डायनासोरचे जीवाश्म सापडले आहे त्याच्या शरीरावर बास्केटबॉलसारखे 'टेक्स्चर' होते.