लंडन : ब्रिटनमध्ये खजिन्याचा शोध घेणार्या एका व्यक्तीस गेल्यावर्षी आपल्याकडील पूर्वीच्या चार आणे (25 पैसे) नाण्याच्या आकाराचे सोन्याचे नाणे सापडले होते.
आता या नाण्याचा 8 सप्टेंबरला लिलाव करण्यात येणार आहे. त्याला दोन कोटी रुपयांची किंमत मिळेल असे अनुमान नाण्याचे मालक आणि लिलाव आयोजित करणारी कंपनी डिक्स नूननने लावले आहे.
हे नाणे 30 पेन्स म्हणजेच सुमारे 31 रुपयांचे आहे. गेल्यावर्षी विल्टशायर आणि हॅम्पशायरच्या सीमेवर हे नाणे सापडले होते. खजिना शोधणार्या व्यक्तीला त्या जागी मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने संकेत मिळाल्यावर तिथे उत्खनन करण्यात आले होते.
बाराशे वर्षांपूर्वीचे हे नाणे वेस्ट सॅक्सनच्या राजा एक्झबर्टच्या काळातील आहे. या नाण्याचे वजन 4.82 ग्रॅम असून व्यास एक इंचापेक्षा कमी आहे.
यावर सॅक्सन शब्दाचा मोनोग्रामभोवती राजाचे नाव एक्झबर्ट रेक्स कोरण्यात आले आहे. लंडनमध्ये अलीकडेच एका प्राचीन चमच्याला ऑनलाईन लिलावात दोन लाख रुपयांची किंमत मिळाली.
एका व्यक्तीने फुटपाथवरील दुकानातून केवळ 90 पेन्समध्ये हा चांदीचा पाच इंची चमचा खरेदी केला होता. तो तेराव्या शतकाच्या अखेरच्या काळातील आहे.