बर्लिन : जर्मनीत डॅन्यूबी नदीजवळ केलेल्या उत्खननात पुरातत्त्व संशोधकांना पाषाणयुगातील भांडी तसेच मध्ययुगातील थडगी सापडली. या थडग्यांमध्ये तलवारी व दागिन्यांचाही शोध लागला.
जर्मनीच्या गिसिंजेन-गुटमॅडिंजेन जिल्ह्यात हे उत्खनन झाले. तिथे संशोधकांना निओलिथिक किंवा पाषाण युगातील एक थडगे सापडले. इसवीसनापूर्वीच्या तिसर्या शतकातील हे थडगे आहे. तिथे कॉर्डेड वेअर संस्कृतीमधील अनेक भांडी आढळून आली. या परिसरातच मध्ययुगाच्या सुरुवातीच्या काळातील 140 थडग्यांचाही शोध घेण्यात आला. ही थडगी इसवी सन 500 ते 600 या काळातील आहेत. तिथे तलवारी, चिलखत, हाडांपासून बनवलेले कंगवे, प्याले आणि कर्ण आभुषणे सापडली.
या जिल्ह्यातील महापौर मार्टिन नम्बर्गर यांनी सांगितले की आमचा गुटमॅडिंजेन जिल्हा अनुमानापेक्षा अधिक प्राचीन असल्याचे यावरून दिसून आले आहे. याठिकाणी अत्यंत प्राचीन काळापासून मनुष्य वसाहत होती. यापूर्वी येथील मानवी वसाहतीची पलिली लिखित नोंद सन 1273 मधील होती.