विश्वसंचार

प्राचीन काळातील विचित्र खेकडा!

Arun Patil

बीजिंग : 'खेकडा' म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर जे चित्र उभे राहते त्यापेक्षा भलताच वेगळा खेकडा एके काळी पृथ्वीवर अस्तित्वात होता. चीनच्या चेंगजियांग लॅजरस्टेट साईटवर या खेकड्याचे जीवाश्म सापडले आहे. त्याची विचित्र शरीररचना पाहून संशोधकही थक्क झाले.

'रेडिओडोंटस्' नावाच्या कॅम्ब्रियन मरीन आथ्राेपोडस्च्या कुळातील सुरुवातीच्या काळातील वैविध्यता यावरून दिसून येते. हा खेकडा एखाद्या टॉयलेट ब्रशसारखा होता. 50 कोटी वर्षांपूर्वी हा खेकडा सध्याच्या नैऋत्य चीनकडील समुद्रतळाशी वावरत असे. एखाद्या ब्रशवर उंचावलेले दोन डोळे, काट्यांसारख्या दोन नांग्या, शेपटीवर लांब पात्यासारखी रचना असलेला हा खेकडा 541 दशलक्ष ते 485 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या कॅम्ब्रियन काळात अस्तित्वात होता. या खेकड्याच्या जीवाश्माचे काही नमुने चीनमध्ये युनान प्रांतात आढळले आहेत. त्यापैकी एक जवळजवळ संपूर्ण स्थितीतील जीवाश्म तरुण वयाच्या खेकड्याचे आहे. हे जीवाश्म सुमारे 6 इंच लांबीचे आणि 2 इंच रुंदीचे आहे. याबाबतची माहिती 'जियोलॉजिकल सोसायटी जर्नल'मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT