लंडन : पोलंडमधील एका शेतात मातीचे भांडे (जग) सापडले. या जगमध्ये सतराव्या शतकातील तब्बल एक हजार नाणी आढळून आली. या खजिन्यातील नाणी तांब्याची बनलेली आहेत.
पूर्व पोलंडमधील झेनिओका या गावात हे मातीचे भांडे सापडले. हे गाव बेलारूस आणि युक्रेनच्या सीमेलगत आहे. मायकल लोटिस नावाच्या एका स्थानिक ग्रामस्थाने मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने या नाण्यांचा शोध लावला. तो एका नव्या मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने बहिणीच्या ट्रॅक्टरचे सुटे भाग शोधून काढत होता. जमिनीत एका ठिकाणी या मशिनने बीपिंग सुरू केल्यावर त्याने तिथे खोदून पाहिले. त्यावेळी त्याला जमिनीत गाडलेले हे मातीचे भांडे सापडले. निमुळत्या मानेचे आणि एक मुठ असलेले हे भांडे होते. त्यामध्ये तांब्याची एक हजार नाणी होती. त्याने याबाबतची माहिती लुबलिनमधील पुरातत्त्व संशोधकांना दिली व त्यांच्याकडे ही नाणी सुपूर्द केली. पोलंडमध्ये परवान्याशिवाय मेटल डिटेक्टरने खजिन्याचा शोध घेणे बेकायदेशीर आहे.