विश्वसंचार

पृथ्वीवर कोसळला अग्निगोल; वेग प्रतितास 43 हजार किमी

Arun Patil

वॉशिंग्टन : पृथ्वीर उल्कापात होणे ही सर्वसाधारण घटना आहे. मात्र, अमेरिकेतील टेक्सास येथे गेल्या आठवड्यात झालेला उल्कापात अनन्यसाधारण होता. जणू आगीचा गोळाच पृथ्वीवर येऊन कोसळतोय, असे त्याचे स्वरूप होते. आता अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने यावर आणखी प्रकाश टाकला आहे. त्यानुसार टेक्सासमधील मॅकलेन येथे 15 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास आकाशातून तप्त गोळा पृथ्वीच्या दिशेने झेपावताना दिसला. त्याचे काही तुकडे आपल्या वसुंधरेवर कोसळले. त्याचे वजन सुमारे 453 किलो होते आणि वेग होता प्रतितास तब्बल 43 हजार किमी.

पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 33 किमी वरच्या बाजूला हा गोळा तुकड्यांच्या स्वरूपात कोसळल्याचे निरीक्षण 'नासा'ने नोंदविले आहे. सध्या या विषयावर 'नासा'चे शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. काही लोकांनी हा उल्कापात होताना प्रत्यक्ष पाहिले आणि त्यांना ते द़ृश्य पाहून धडकीच भरली. त्यांनी तातडीने पोलिस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनीही त्या ठिकाणी धाव घेतली. तथापि, तोपर्यंत उल्कापात होऊन गेला होता. आता अमेरिकेच्या हवामान सेवा विभागातील मॅथ्यू सिड्रॉफ यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

ते म्हणाले, आमच्याकडे अशा गोष्टींचा अंदाज घेणारी यंत्रणा उपलब्ध आहे. तथापि, त्यावर उल्कापाताची नोंद झालेली नाही. मात्र, या घटनेला काहींनी आपल्या मोबाईलमध्ये कैद करून त्याचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यात आगीचा एक गोळा पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचे दिसत आहे. तसेच उल्कापात झाल्यानंतरचा महाकाय आवाजही त्यात रेकॉर्ड झाला आहे. एक मात्र खरे की, 'नासा'ने ही घटना गंभीरपणे घेतली असून त्याविषयी लगेच अभ्यास सुरू केला आहे.

फ्रान्स आणि इटलीमध्येही

विशेष म्हणजे अशा स्वरूपाचे अग्निगोल फ्रान्स आणि इटलीमध्येही गेल्या आठवड्यात कोसळल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे आता या गूढ घटनेमुळे तेथील खगोल शास्त्रज्ञही या घटनांमुळे अचंबित झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT