पीटर्सबर्ग : आजकाल विमानाने प्रवास करणे ही मोठी गोष्ट राहिलेली नाही. पूर्वी विमानात बसणे म्हणजे एखादे स्वप्न पूर्ण होण्यासारखे होते. तथापि, आता विमानसेवा ही सहज आणि परवडणार्या दरात उपलब्ध असल्याने लोक विमान प्रवासाला प्राधान्य देतात. अशावेळी आपल्याला सहज प्रश्न पडतात की, सामान्यांसाठी विमानसेवा कधी सुरू झाली? कोणत्या देशात सुरू झाली? पहिल्या विमान प्रवासासाठी प्रवाशांकडून किती दर आकारले? पहिल्या प्रवासी विमानाने कधी उड्डाण केले ही सगळी माहिती रंजक आहे.
जगातील पहिल्या विमानाने 109 वर्षांपूर्वी म्हणजे 1 जानेवारी 1914 साली अमेरिकेत पीटर्सबर्ग ते टाम्पादरम्यान उड्डाण केले होते. तसे पाहायला गेले तर या दोन शहरांतील अंतर अवघे 42 किलोमीटर आहे. तथापि, या विमानाला हे अंतर पूर्ण करण्यासाठी तेव्हा 23 मिनिटे लागली होती. विमानाचे वजन होते 567 किलो. त्याची लांबी आठ मीटर आणि रुंदी 13 मीटर होती. या विमानात केवळ एक पायलट आणि एक प्रवासी बसेल एवढी जागा होती. प्रवाशाला बसण्यासाठी विमानात लाकडी सीट बनवण्यात आली होती. या पहिल्या विमानाच्या वैमानिकाचे नाव होते टोनी जेन्स.
1 जानेवारी 1914 साली विमानाने पहिल्यांदा प्रवाशासह उड्डाण केले तेव्हा संपूर्ण जगात त्याची केवढी चर्चा झाली होती. विशेष म्हणजे या विमानाच्या तिकिटासाठी लिलाव करण्यात आला होता. कारण, विमानात एकाच प्रवाशासाठी जागा उपलब्ध होती. फील नावाच्या प्रवाशाने पहिले तिकीट खरेदी केले होते. हे जगातील पहिले विमानाचे तिकीट असून याची किंमत त्या वेळी 400 डॉलर इतकी होती. भारतीय रुपयामध्ये सांगायचे झाले तर याची किंमत होती 6 लाख 2 हजार 129. त्यानंतर हवाई सेवेत आमूलाग्र सुधारणा होत गेली आणि आता तर हजारो मैलांचे अंतर अत्याधुनिक विमाने केवळ काही तासांत पार करत आहेत.