विश्वसंचार

परागीकरण करणार्‍या कीटकांवरही प्रदूषणाचा दुष्परिणाम

अमृता चौगुले

वॉशिंग्टन ः जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगातील दहा सर्वात प्रदूषित शहरांपैकी नऊ शहरे भारतातच आहेत. हवेच्या प्रदूषणाचा केवळ मानवावरच नव्हे तर पशुपक्षी आणि कीटकांवरही दुष्परिणाम होत असतो. भारतीय संशोधकांनी त्याबाबतचे अध्ययनही केले आहे. मधमाश्यांसारख्या परागीकरण करणार्‍या कीटकांवरही हवेच्या प्रदूषणाचा अतिशय दुष्परिणाम होतो, असे त्यांनी म्हटले आहे.

बंगळूरमधील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेजमधील नॅचरलिस्ट इन्स्पायर्ड केमिकल इकॉलॉजी (एनआयसीई) प्रयोगशाळेत दीर्घकाळापासून कीटकांवर संशोधन करीत असलेल्या संशोधकांनी याबाबतची माहिती दिली आहे. बंगळूरच्या वेगवेगळ्या भागांत 'जायंट एशियन' मधमाश्यांवरील वेगवेगळ्या वायू प्रदूषणाच्या स्तराच्या प्रभावाचा अभ्यास करण्यात आला. स्थानिक स्तरावर करण्यात आलेल्या सुरुवातीच्या निरीक्षणात आढळून आले की शहरांमध्ये परागीकरण करणार्‍या कीटकांची संख्या कमी होत आहे. मात्र, त्यामागील कारण समजलेले नव्हते. पाण्याची कमतरता, सावली नसणे अशी कारणे असावीत का, हे पाहिले जात होते.

'जायंट एशियन' मधमाशी ही सर्वसाधारणपणे भारतीय शहरांमध्ये आढळते व त्यामुळे बंगळूरमधील अशा मधमाश्यांचे निरीक्षण करण्यात आले. देशातील 80 टक्क्यांपेक्षा अधिक मध याच प्रजातीच्या मधमाश्यांमुळे मिळतो. केवळ कर्नाटकातच ही मधमाशी 687 प्रकारच्या वनस्पतींमध्ये परागीकरण करण्यासाठी ओळखली जाते.

डॉ. गीता जी.टी. या संशोधिकेने म्हटले आहे की अशी मधमाशी आणि प्रयोगशाळेतील फळ माशी यांच्यावरील हवेच्या प्रदूषणाच्या प्रभावाचा अभ्यास करण्यात आला. प्रदूषणामुळे त्यांचे आयुष्य, व्यवहार, हृदयगती, रक्‍तपेशींची संख्या आणि तणाव तसेच रोगप्रतिकारकता, चयापचयाशी संबंधित जनुकांच्या अभिव्यक्‍तीमध्ये फरक पडतो असे दिसून आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT