विश्वसंचार

पत्नीला भेटण्यासाठी सायकलवरून गाठले होते युरोप!

Shambhuraj Pachindre

लंडन : काही लोकांच्या प्रेमकथा अफलातूनच असतात. अर्थात हे प्रेम लग्नाच्या आधीचेच असते असे नाही तर लग्नानंतरचेही असते. पत्नीवर जीवापाड प्रेम करणारे, तिचा विरह सहन न करणारे अनेक लोक असतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे पी.के. महानंदिया. ते युरोपमध्ये असलेल्या पत्नीला भेटण्यासाठी व्याकूळ झाले होते; पण विमान प्रवासासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे 1977 मध्ये त्यांनी चक्क सायकलवरून प्रवास करीत युरोप गाठले होते!

भारतातील आर्टिस्ट प्रद्युम्न कुमार महानंदिया यांची ही 'लव्हस्टोरी' सध्याही सोशल मीडियात चर्चेचा विषय बनलेली आहे. स्वीडनच्या रहिवासी असलेल्या चार्लोट वॉन शेडविन या त्यांच्या पत्नी आहेत. दोघांची पहिली भेट 1975 मध्ये दिल्लीत झाली. चार्लोट यांनी महानंदिया यांच्या कलेबाबत ऐकले तेव्हा त्या त्यांना भेटण्यासाठी युरोपमधून भारतात आल्या होत्या. त्यांच्याकडून त्यांना स्वतःचे एक पोर्ट्रेट बनवून घ्यायचे होते. महानंदिया ज्यावेळी त्यांचे पोर्ट्रेट बनवत होते त्यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. चार्लोटची स्वीडनला परत जाण्याची वेळ आली त्यावेळी दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. महानंदिया यांच्या कुटुंबीयांच्या आशीर्वादाने हे लग्न झाले. महानंदिया यांना आपले शिक्षण पूर्ण करायचे असल्याने ते चार्लोट यांच्यासमवेत स्वीडनला जाऊ शकले नाहीत. दोघे पत्राद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहिले. एक वर्षानंतर महानंदिया यांनी पत्नीला भेटण्याचे ठरवले; पण विमानाचे तिकीट घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. अखेर त्यांनी त्यांच्याकडे जे काही होते ते विकून एक सायकल खरेदी केली. पुढच्या चार महिन्यांत त्यांनी पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, तुर्की अशा मार्गाने युरोप गाठले. 22 जानेवारी 1977 ला त्यांचा हा प्रवास सुरू झाला. ते दररोज 70 किलोमीटरचा प्रवास करीत. पुढे इस्तंबूल आणि व्हिएन्नामार्गे युरोपमध्ये आल्यावर ट्रेनने गोटेन्बर्गला गेले व पत्नीला भेटले! आता हे जोडपे त्यांच्या दोन मुलांसह स्वीडनमध्येच राहते.

SCROLL FOR NEXT