विश्वसंचार

‘पँजिया’ खंडाच्या काळात ‘शिजलेले’ जीवाश्म!

Arun Patil

लंडन : संशोधकांना आयर्लंडमध्ये एक विचित्र जीवाश्म आढळून आले होते. या जीवाश्मावर दीर्घकाळापासून संशोधन सुरू होते व आता त्याच्या स्वरूपाबाबत नवी माहिती स्पष्ट झाली आहे. तब्बल 30 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील काही विखुरलेले खंड एकत्र येऊन एकमेकांना धडकले व 'पँजिया' या एकाच 'सुपरकाँटिनंट'ची म्हणजेच महाखंडाची निर्मिती झाली. त्यावेळी पृथ्वीच्या पोटातून उसळलेल्या अतिउष्ण अशा रसामुळे भाजलेले हे जीवाश्म आहे. ते जणू काही भट्टीत शिजवलेल्या पदार्थासारखेच बनले आहे.

हे जीवाश्म प्रामुख्याने टेट्रापोडस्सारख्या उभयचर प्राण्यांच्या समूहाचे आहे. त्यांचे कुळ (जीनस) 'केरॅटरपेटन' या नावाने ओळखले जाते. दक्षिण आयर्लंडमधील किलकेनी कौंटीतील जॅरो अ‍ॅसेब्लेग याठिकाणी सन 1866 मध्ये कोळशाच्या एका स्तरात हे जीवाश्म आढळून आले होते. केरॅटरपेटन हे सॅलॅमँडरसारखे हाताच्या पंज्याइतक्या आकाराचे जीव होते. त्यांना ड्रॅगनसारखी शिंगे होती असे आयर्लंडमधील युनिव्हर्सिटी कॉलेज कॉर्कमधील संशोधकांनी म्हटले आहे. हे जीवाश्म 32 कोटी वर्षांपूर्वीच्या कार्बोनिफेरस काळातील आहे. हा काळ 359 ते 299 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे. या जीवाश्मातील बराचसा भाग आजुबाजूच्या कोळशाने व्याप्त झालेला आहे.

त्यामुळे हे जीवाश्म मुळात कसे होते याचा अंदाज करणे कठीण आहे. त्यामध्ये अ‍ॅपेटाईट क्रिस्टल्स किंवा फॉस्फेट खनिजही मोठ्या प्रमाणात आहे. हे खनिज बहुतांश प्राण्यांच्या हाडात असते. तसेच ते ज्वालामुखीतून बाहेर आलेल्या खडकांमध्येही असते. यापूर्वी असे मानले जात होते की हे जीवाश्म आम्लयुक्त मातीत दबले गेल्याने असे बनले आहे. मात्र आता नव्या संशोधनानुसार ते 'पँजिया'च्या निर्मितीवेळी उसळलेल्या तप्त रसामुळे असे बनले असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याची माहिती 'पॅलियोंटोलॉजी' नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT