वेलिंग्टन : न्यूझीलंडच्या आकाशात रविवारी एक रहस्यमय प्रकाश दिसून आला. सायंकाळी साडेसातच्या दरम्यान साऊथ आयलंडमध्ये हा प्रकाश प्रामुख्याने दिसला. वर्तुळाकारात फिरत असलेला हा निळा प्रकाश पाहून लोक थक्क झाले. हे नेमके काय आहे, याचे कुतूहल वाढले. हा प्रकाश दक्षिणेकडे 750 किलोमीटरपर्यंत प्रवास करून स्टीवर्ट बेटापर्यंत पोहोचला.
लोकांनी या अद्भुत प्रकाशाचे फोटो व व्हिडीओ टिपले. ते अर्थातच सोशल मीडियातही व्हायरल झाले. या प्रकाशाने अनेक प्रश्नांना जन्म दिला. विशालकाय असा हा निळा प्रकाश एखाद्या आकाशगंगेसारखा वर्तुळाकार फिरत पुढे सरकत होता. हा प्रकाश म्हणजे स्पेसएक्स रॉकेट लाँचचे फ्युएल डंप असावे, असेही काहींना वाटले.
याचा अर्थ हा प्रकाश नैसर्गिक नसून तो मानवनिर्मित गोष्टींमुळे बनलेला असावा. न्यू प्लाय माऊथ अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीने याबाबत फेसबुकवरून स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला. असा प्रकाश यापूर्वीही पाहण्यात आला असल्याचे त्यामधून सांगण्यात आले. मात्र, युजर्सनी स्पेसएक्स कंपनीबरोबरच्या त्याच्या संबंधांबाबतही प्रश्न विचारले आहेत.