न्यूयॉर्क : कोरोनावर मात करण्यासाठी सध्या जगभर लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे. मात्र, तरीही संक्रमणाची नवी प्रकरणे समोर येतच आहेत. त्यामुळे अन्यही उपायांकडे लक्ष दिले जात आहे. त्यामध्येच अँटिबॉडी उपचाराचाही समावेश आहे. हलके संक्रमण असलेल्या रुग्णांसाठी ते लाभदायक सांगितले जाते.
आता याबाबत एक नवे संशोधन करण्यात आले आहे. त्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, दोन मोनोक्लोनल अँटिबॉडी उपचारामुळे हलक्या ते मध्यम संक्रमणाच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येणार नाही.
'द लान्सेट' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. हे मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेल 'केसिरिविमॅब' आणि 'इमडेविमॅब'चे मिश्रण आहे. त्याला अमेरिकेच्या 'एफडीए'कडून आपत्कालीन मंजुरीही मिळाली आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळी कोरोना संक्रमित झाले होते त्यावेळी त्यांच्यावरील उपचारासाठीही दोन अँटिबॉडीजचे एक कॉकटेल देण्यात आले होते. अँटिबॉडी कॉकटेलचा वापर कोरोनाच्या हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या संक्रमणाने ग्रस्त अशा रुग्णांवर वापर केला जातो.
हे रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर नसतात; पण त्यांना गंभीर आजाराचा धोकाही असतो. ई-क्लिनिकल मेडिसीन जर्नलनुसार कोरोनाने संक्रमित 1,400 रुग्णांवर या 'कॉम्बो' कॉकटेलचा वापर करण्यात आला. त्यापैकी 696 रुग्णांना डिसेंबर 2020 पासून एप्रिलपर्यंत औषधाचे मिश्रण देण्यात आले व अन्य रुग्णांना ते दिले नाही.
उपचारानंतर 14, 21 आणि 28 दिवसांमध्ये रुग्णांच्या आजाराचे मूल्यांकन करण्यात आले. त्यामधून असे दिसून आले की, ज्या रुग्णांना औषधांचे मिश्रण देण्यात आले होते, त्यांच्यापैकी अतिशय कमी म्हणजे 1.3 टक्के रुग्णच रुग्णालयात भरती झाले.